भारताविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर आयर्लंडला मोठा धक्का, प्रशिक्षकाचा अचानक राजीनामा!

आयर्लंडने गेल्या रविवारी (२८ जून) भारताविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. आयर्लंडने टीम इंडियाविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. आता या ऐतिहासिक विजयानंतर आयर्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) हेनरिक मलान (Heinrich Malan) यांनी करार संपण्यापूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

​मलान यांचा करार २०२७ च्या सुरुवातीपर्यंत होता, परंतु त्यांनी त्यापूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट आयर्लंड बोर्डाने सोमवारी (२९ जून) घोषणा करताना सांगितले की, हेनरिक पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होत आहेत.

​४५ वर्षीय हेनरिक मलान यांच्याकडे २०२२ मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी ४ वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर काम केले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली आयर्लंडने अनेक यश संपादन केले, ज्यामध्ये भारताविरुद्धची टी-२० मालिका जिंकणे हे सर्वात मोठे यश आहे. याशिवाय, संघाने सलग तीन वेळा टी-२० वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केले. आयर्लंडचे पहिले तीन कसोटी विजय देखील प्रशिक्षक हेनरिक यांच्या मार्गदर्शनाखालीच मिळाले.

​हेनरिक मलान म्हणाले, “या खेळाडू, स्टाफ आणि आयरीश क्रिकेट समुदायासोबत काम करणे माझ्यासाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट होती. माझा आणि माझ्या कुटुंबाचा येथील अनुभव अत्यंत उत्कृष्ट होता आणि आम्ही आयरीश क्रिकेटशी जोडलेल्या आमच्या काळाला नेहमीच प्रेमाने आठवणीत ठेऊ.”

​ते पुढे म्हणाले, “मैदानावर, आम्ही अभिमानाने अनेक ऐतिहासिक विजयांची आठवण काढू शकतो, जसे की मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजय, अबू धाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध पहिला कसोटी विजय, बेलफास्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिला घरचा कसोटी विजय, भारताविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजय आणि पाकिस्तान, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे. यासोबतच जगातील टॉप संघांना आव्हान देण्याच्या आणि त्यांना हरवण्याच्या सातत्यपूर्ण क्षमतेच्या जोरावर टी-२० वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय करणे, हे देखील आमचे मोठे यश राहिले.”

Comments are closed.