भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक 2028 मध्ये केले आपले स्थान निश्चित, पुरुष संघाला मात्र अद्याप प्रतीक्षा!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांनी २०२८ मध्ये लॉस एंजिल्समध्ये (LA28) होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्रिकेटसाठी पात्रता मार्गाला आज (२९ जून) पुष्टी दिली आहे. आयसीसी पहिल्यांदा आयओसी पात्रता स्पर्धेत समाविष्ट झाला आहे. टी२० प्रकारच्या या स्पर्धेत पुरुष आणि महिला स्पर्धांमध्ये प्रत्येकी सहा देश सहभागी होतील. हे सर्व सामने पोमोना येथील खास क्रिकेटसाठी तयार केलेल्या मैदानावर खेळले जातील.

या स्पर्धेत चार खंडांचे (आफ्रिका, आशिया, युरोप आणि ओशेनिया) प्रतिनिधित्व निश्चित झाले आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी पाच पात्रता स्थाने सध्याच्या आयसीसी स्पर्धा आणि आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारी यांच्या एकत्रितकरणामधून ठरवले जातील. पुरुष आणि महिला या दोन्ही स्पर्धांमधील सहावे आणि अंतिम स्थान नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयसीसी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जाईल, जी २०२७ मध्ये आयोजित केले जाणार आहे.

सध्या सुरू असलेल्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेमुळे पहिल्या चार संघांची पात्रता निश्चित झाली आहे. यामध्ये चार खंडांमध्ये अनुक्रमे सर्वोच्च स्थान मिळवणारे संघ म्हणून ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन (इंग्लंड), भारत आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरले आहेत. दुसरीकडे पुरुष संघांची पात्रता आयसीसी टी२० क्रमावारीनुसार ठरवली जाणार आहे. यामध्ये ३१ डिसेंबर, २०२६ पर्यंत चार खंडांमधील ज्या संघांची क्रमवारी सर्वोच्च असेल ते पात्र ठरतील.

ही स्पर्धा लॉस एंजिल्समध्ये खेळली जाणार असली तरी यजमान राष्ट्र या नात्याने अमेरिका पुरुष आणि महिला स्पर्धांसाठी पात्र ठरतील, मात्र त्यासाठी त्यांना ३१ डिसेंबर, २०२६ च्या अंतिम तारखेपर्यंत संबंधित आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमावारीत अव्वल १५ मध्ये असणे आवश्यक आहे.

Comments are closed.