अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
अजित पवार विमान अपघातावर गोपीचंद पडळकर अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र विकासाला मुकला आहे. त्यांच्या विमानाचा अपघात होता की घातपात यावर कोणी चर्चा करत असेल तर मी त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले. अजित पवार (Ajit Pawar) यांचे निधन होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अचानक ही सगळी घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील लोक दु:खात आहेत. आता त्याच्यावर कोणी शंका घेत असेल तर याबाबत वरिष्ठ स्तरावरचे लोक स्पष्टता नक्की देतील. मी इतकंच म्हणेन की, अजितदादांचं निधन हे महाराष्ट्रासाठी खूप नुकसान करणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा मोठा वाटा होता. याच्यापेक्षा मी या विषयावर काही अधिक बोलू शकत नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तसेच दोन्ही राष्ट्रावादी काँग्रेसचे विलीनीकरण (NCP Merger) हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत दोन्ही पक्षांचे नेतेच बोलू शकतात, मी त्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात महायुती (Mahayuti) सक्षमपणे काम करत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तरी राज्यातील स्थितीत फारसा फरक पडणार नाही, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
गोपीचंद पडळकर यांना महायुतीचा भाग असणाऱ्या एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वादाबाबतही विचारणा करण्यात आली. त्यावरही गोपीचंद पडळकर यांनी थेट बोलणे टाळले. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे दोघेही वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यासमोर मी छोटा कार्यकर्ता आहे, अशी मोघम टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच पडळकर यांनी धनगर आरक्षणाबाबतही भाष्य केले. आमच्या पिढ्यानपिढ्या बरबाद झाल्या. धनगर समाजाला मिळालेले आरक्षण कोर्टात टिकलं नाही. सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी. याबाबत खुली चर्चा करावी. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत जे काही करावं लागेल ते मी करणार, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला.
Tipu Sultan controversy: टिपू सुलतानाशी शिवरायांची तुलना करणाऱ्यांना भरचौकात फाशी दिले पाहिजे: गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर यांनी राज्यात सध्या टिपू सुलतानावरुन सुरु असलेल्या वादाबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राज्यात नीच आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानाची बरोबरी करणाऱ्यांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. काँग्रेस पक्ष मतांच्या राजकारणासाठी कोणत्याही थराला जात आहे. हर्षवर्धन सपकाळांचे वक्तव्य महाराष्ट्राला शोभनीय नाही. छत्रपती शिवरायांनी केलेले काम हे जगाला माहीत आहे. छत्रपती हे देशाची अस्मिता आहे. टिपू सुलतानाला राष्ट्रपुरुषांच्या यादीत बसवण्याची विरोधकांची भूमिका आहे.
कोण अशी भूमिका घेत असेल तर त्यांनी टिपू सुलतान यांचा फोटो गळ्यात अडकवून फिरावे. टिपू सुलतान यांचे फोटो जिथे जिथे असतील तेथून सरकारने ते काढून टाकले पाहिजेत. काँग्रेसची विचारधारा चुकीची असल्यामुळे आज काँग्रेस रसातळाला गेली आहे. त्यांना देशाच्या हिताचे काहीच पडले नाही. काँग्रेस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या पूर्णपणे उलट वागणारी लोकं आहेत. जे कोणी टिपू सुलतानाबाबत विधान करत असेल तर त्याच्या गळ्यातच असे फोटो अडकवले पाहिजेत. टिपू सुलतानाबाबत जर कोणाला प्रेम उतू जात असेल तर तर त्यांनी पोरांची नावं शाहिस्तेखान, अफजल खान अशी ठेवावीत. हा मुद्दा आमच्या राजकारणाचा नसून अस्मितेचा आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.