Ratnagiri News – रत्नागिरीत 24 मे रोजी भव्य दिव्यांग शिबिर; 300 गरजूंना आधुनिक कृत्रिम पायांचे मोफत वाटप होणार
भारत विकास परिषदेचे दिव्यांग पुनर्वसन केंद्र (पुणे), स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत एका विशेष दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या 24 मे रोजी साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे पार पडणार असून, याद्वारे 300 दिव्यांगांना प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचा आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय मोफत दिला जाणार असल्याची माहिती पुनर्वसन केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पाय बसवून हे कार्य थांबणार नाही, तर कृत्रिम पाय बसवल्यानंतरच्या पुढील देखभालीची संपूर्ण जबाबदारी देखील संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. यापूर्वी चिपळूण आणि श्रृंगारतळी येथे अशा प्रकारची शिबिरे यशस्वीपणे राबवण्यात आली होती. आता रत्नागिरी शहरात मोठ्या स्तरावर हे नियोजन करण्यात आले असून, नाव नोंदणी करणाऱ्या दिव्यांगांची संख्या 400 पर्यंत पोहोचली तरी त्या सर्वांना हे आधुनिक पाय उपलब्ध करून देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.
स्कॉन प्रो फाउंडेशनचे अधिकारी राहुल पुरकर यांनी या समाजोपयोगी कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. या पत्रकार परिषदेला शिबिराचे समन्वयक तथा स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांचीही उपस्थिती होती. या शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी नाव नोंदणीसाठी कुलकर्णी (९३७१०८८९११) किंवा संजीव (७०२८०४५९५५) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विनय खटावकर यांनी केले आहे.
Comments are closed.