वाढत्या वाहतूक कोंडीमुळे चिपळूणकर हैराण, रस्त्यावरील हातगाड्या, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा
गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आधीच पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसताना रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या हातगाड्या, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण, तसेच दुकानांसमोर होणारे बेशिस्त वाहन पार्किंग यामुळे बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.
चिपळूणची बाजारपेठ मोठी असून गुहागर, सावर्डे, पोफळी यासह तालुक्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी शहरात येतात. सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र, शहरात ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना आपली वाहने रस्त्यावर किंवा दुकानांच्या समोर उभी करावी लागत आहेत. शहरातील अनेक रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात रस्त्याच्या कडेला फळ विक्रेते आणि अन्य व्यावसायिक हातगाड्या लावून व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीचे साहित्य विक्री करणारे स्टॉलही रस्त्याच्या कडेला उभारण्यात आल्याने वाहतुकीच्या समस्येत आणखी भर पडली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावरील अतिक्रमण आणि हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून झाल्यानंतर नगरपालिकेकडून काही वेळा कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई केवळ तात्पुरती ठरत असल्याचे चित्र आहे. कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी हातगाड्या उभ्या राहात असल्याने वाहतुकीचा प्रश्न कायम राहातो.
काही विक्रेत्यांनी दुकानासमोरील जागा ही आपलीच असल्याप्रमाणे वागण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. दुकानासमोर वाहने उभी करणाऱ्या ग्राहकांना काही विक्रेत्यांकडून वाहने हटविण्यास सांगितले जाते. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी आपली वाहने नेमकी कुठे लावायची , असा प्रश्न निर्माण होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडीवर तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्या व स्टॉलवर नियमित कारवाई, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणि शहरात योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे. चिपळूण नगरपालिकेकडून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना केव्हा होणार आणि शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केव्हा होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Comments are closed.