हिंजवडीतील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेविरोधात नागरिक व IT अभियंते आक्रमक; 6 सप्टेंबरच्या मोर्चाला शिवसेनेचा पाठिंबा

हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील जीवघेणे खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर आयटी अभियंत्यांपाठोपाठ स्थानिक रहिवासीही रस्त्यावर उतरले आहेत. 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष आंदोलनाला हिंजवडी, माण आणि मारुंजी गावातील नागरिकांनी एकमुखाने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या मोर्चाला पूर्ण पाठिंबा दर्शवत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्याच्या हिंजवडी रहिवासी मोर्च्याला पाठींबा! काही दिवसांपूर्वी मी हिंजवडीला स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भयंकर वाहतूक कोंडी, नियमित न उचलला जाणारा कचरा, हाऊसिंग सोसायट्यांना अपुरा पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांचा अभाव, या सगळ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ज्या हिंजवडीला आपण देशाच्या IT सेक्टरचं नाक म्हणतो, त्याच हिंजवडीत शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

फॉर्च्युन 500 कंपन्या असो किंवा स्टार्टअप्स असो आणि ये-जा करणारे लाखो नागरिक असलेल्या ह्या परिसराची ही अवस्था किती दिवस अशीच राहणार? मेट्रोच उदघाटन पेंडिंग, रस्त्याचे खड्डे आणि दुरवस्था तशीच, ट्राफिकसाठी कॉन्स्टेबल तैनात नाहीत. जर इथून या कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला तर असलेल्या रोजगारांचं काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री काल हिंजवडी जवळ आले पण आयटी सेक्टरमधील हिंजवडीत राहणाऱ्यांना भेटलेच नाहीत! त्यांना भेटण्याऐवजी आपल्या परिसरासाठी आवाज उठवणाऱ्या नागरिकांना घरातच बंदिस्त केल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत, असे म्हणत उद्याच्या स्थानिक नागरिकांच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. हिंजवडीच्या नागरिकांसाठी लढण्याचा आमचा इरादा पक्का आहे, असेही आदित्य ठाकरे ठामपणे म्हणाले.

Comments are closed.