हैदराबादचा IPL मधील सर्वात लाजिरवाणा पराभव! अहमदाबादमध्ये एकतर्फी सामना, गुजरात टायटन्स पॉइंट्स

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद IPL 2026 : आयपीएल 2026 मधील 56वा सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्स ने सनरायझर्स हैदराबाद वर तब्बल 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. धावांच्या फरकाने मिळालेला हा गुजरातचा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 168 धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या 14.4 षटकांत 86 धावांवर गारद झाला. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला आणि सामना एकहाती जिंकून दाखवला. या शानदार विजयासह गुजरात टायटन्स ने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

साई सुदर्शन अन् वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार शुभमन गिल (5) आणि जोस बटलर (7) स्वस्तात बाद झाले. मात्र, साई सुदर्शनने एका बाजूने खिंड लढवत 44 चेंडूत 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरची (50 धावा, 33 चेंडू) उत्तम साथ मिळाली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 168 धावांचे लक्ष्य उभे केले. हैदराबादकडून प्रफुल हिंगे आणि साकिब हुसैन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

फलंदाजीचा सपशेल फ्लॉप शो

169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब राहिली. ट्रॅविस हेड शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्या. नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक 24 धावा केल्या, तर कर्णधार पॅट कमिन्सने 19 धावांचे योगदान दिले. मात्र, इतर एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. संपूर्ण संघ 14.5 षटकांत केवळ 86 धावांवर आटोपला.

होल्डर आणि रबाडाचा कहर…

गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली होती. कागिसो रबाडाने 28 धावा देत 3 महत्त्वाचे बळी टिपले, तर जॅसन होल्डरने 20 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले. प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि रशीद खान व मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेत हैदराबादच्या डावाला खिंडार पाडले.

हे ही वाचा –

BCCI Dot Ball Green Initiative : IPL 2026 मध्ये डॉट बॉल पडला की झाड का दिसतं? BCCI च्या ‘त्या’ एका नियमामुळे देशात सुरू झाली हरित क्रांती

आणखी वाचा

Comments are closed.