IPL 2026 : विराट कोहलीचा आक्रमकपणा हा केवळ दिखावा? माजी क्रिकेटपटूने मांडले स्पष्ट मत
मैदानावर प्रत्येक चेंडूगणिक दिसणारा उत्साह, प्रत्येक विकेटवरची ती गर्जना आणि विजयाची जिद्द विराट कोहलीचा हाच अंदाज त्याला इतर खेळाडूंपासून वेगळे ठरवतो. पण गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये एक चर्चा सुरू आहे की, विराटचा हा आक्रमकपणा खरा आहे की केवळ कॅमेऱ्यासाठी केलेला दिखावा? आता या वादावर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
IPL 2026 मध्ये शानदार फलंदाजी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफच्या शर्यतीत कायम राखणारा विराट कोहली (Virat Kohli) सध्या अचानक खराब फॉर्मशी झुंजत आहे. सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच दरम्यान मांजरेकर यांनी विराटचा स्वभाव आणि त्याच्या मानसिकतेवर मोठे विधान केले. स्पोर्टस्टारच्या पॉडकास्टवर बोलताना मांजरेकर म्हणाले की, विराटची मैदानातील आक्रमकता हा कोणताही नवा दिखावा नसून, त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच ती त्याची ओळख राहिली आहे. दिल्लीच्या U19 दिवसांपासून आजपर्यंत विराटच्या खेळण्याची पद्धत अगदी तशीच आहे.
मांजरेकर पुढे म्हणाले, अनेक लोक, अगदी काही खेळाडूही असं मानतात की विराट कॅमेऱ्यासाठी हे सर्व करतो. पण मी याच्याशी अजिबात सहमत नाही. मी त्याला अंडर-19 स्तरापासून खेळताना पाहिलं आहे. तो नेहमीच असा खेळत आला आहे आणि हीच गोष्ट त्याला एक फलंदाज म्हणून प्रवृत्त करते. जेव्हा तो प्रतिस्पर्धी संघावर चिडलेला असतो, तेव्हा तो अधिक चांगली कामगिरी करतो.
मैदानातील प्रत्येक लहान-मोठ्या घटनेवर विराटची आक्रमक प्रतिक्रिया अनेकांना चकित करते. आयपीएलमधील एखादी साधी विकेट असो किंवा वर्ल्ड कपमधील मोठा क्षण, त्याचा उत्साह कधीच कमी होत नाही. यामुळेच अनेकजण याला ‘कॅमेरा ड्रामा’ समजतात. मात्र, मांजरेकर यांच्या मते हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा नैसर्गिक भाग आहे.
वयाच्या 37 व्या वर्षीही विराटची ही ऊर्जा पाहून मांजरेकर थक्क होतात. ते म्हणाले की, साधारणपणे वय वाढल्यानंतर खेळाडू थोडे शांत होतात, पण कोहलीच्या बाबतीत तसे घडले नाही. ते म्हणाले, मला वाटलं होतं की या वयात तो थोडा शांत होईल, पण आजही तो ज्या पद्धतीने कॅच घेतो, रन आऊट करतो आणि मैदानात प्रचंड ऊर्जा दाखवतो, ते पाहून नवल वाटते. या संवादादरम्यान मांजरेकर यांनी विराटच्या स्वभावाचा आणखी एक पैलू सांगितला. ते म्हणाले की, बाहेरून अत्यंत आत्मविश्वासी दिसणारा विराट आपल्यावर होणाऱ्या टीकेबाबत खूप हळवा (Sensitive) देखील आहे.
Comments are closed.