एमएस धोनी आता युरोपमध्ये खेळणार? बॉलिवूड अभिनेत्याच्या विधानाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ!
भारतीय क्रिकेटमध्ये जर एखाद्या खेळाडूसाठी सर्वात जास्त वेडेपण पाहायला मिळत असेल, तर ते नाव आहे एम.एस. धोनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊन अनेक वर्षे उलटली असली, तरी धोनीची क्रेझ कमी झालेली नाही. आता बॉलिवूड अभिनेता आणि ETPL चा सह-संस्थापक अभिषेक बच्चन याने अशी एक इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहते कमालीचे उत्साही झाले आहेत.
डब्लिनमध्ये अभिषेक बच्चनला विचारण्यात आले की, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला त्याला युरोपियन T20 प्रीमियर लीग म्हणजेच ETPL मध्ये खेळताना पाहायला आवडेल? या प्रश्नावर त्याने एक क्षणही न घालवता उत्तर दिले- ‘महेंद्रसिंग धोनी’. पीटीआयशी (PTI) बोलताना अभिषेक म्हणाला की, “महेंद्रसिंग धोनीला क्रिकेटच्या मैदानावर का पाहायचे आहे, यासाठी कोणाला कारण देण्याची गरज आहे का?” जरी महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी त्याची लोकप्रियता आजही जगभरात कायम आहे. तो अजूनही चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे, मात्र IPL २०२६ च्या हंगामात, स्पर्धेपूर्वी लागलेल्या पिंढरीच्या दुखापतीमुळे तो मैदानावर दिसला नाही.
अभिषेक बच्चनने बीसीसीआयच्या (BCCI) त्या नियमाचाही उल्लेख केला, ज्याुळे सध्याचे भारतीय खेळाडू परदेशी T20 लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. तो म्हणाला की, “आमची इच्छा होती की सध्याचे भारतीय क्रिकेटपटू देखील ETPL चा भाग असावेत. पण आपल्याला माहिती आहेच की, बीसीसीआयच्या करारबद्ध भारतीय खेळाडूंना आयपीएल व्यतिरिक्त कोणत्याही परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांना आमच्यासोबत पाहणे शानदार ठरले असते.”
त्याने पुढे सांगितले की, भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू ETPL मध्ये खेळण्यासाठी येत आहेत, त्यामुळे ही लीग शानदार होईल असा त्याला विश्वास आहे. अभिषेक बच्चनने ETPL च्या व्हिजनबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला की, या लीगचा उद्देश युरोपमधील स्थानिक खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. युरोपियन T20 प्रीमियर लीग २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली जाईल. या नवीन फ्रँचायझी आधारित लीगशी अनेक मोठी नावे जोडली गेली आहेत. राहुल द्रविड ‘डब्लिन गार्डियन्स’ फ्रँचायझीचा सह-मालक बनला आहे, तर स्टीव्ह वॉ, जोंटी रोड्स आणि ग्लेन मॅक्सवेल देखील वेगवेगळ्या फ्रँचायझींशी जोडले गेले आहेत.
Comments are closed.