IPL 2026 मध्ये डॉट बॉल पडला की झाड का दिसतं? BCCI च्या ‘त्या’ एका नियमामुळे देशात सुरू झाली हरि

BCCI डॉट बॉल ग्रीन इनिशिएटिव्ह IPL 2026 : आयपीएल (IPL) सामने असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की एखादा गोलंदाज डॉट बॉल टाकतो, तेव्हा स्क्रीनवर हिरवं झाड दिसतं. अनेकांना प्रश्न पडतो की या झाडाचा आणि आयपीएलचा नेमका संबंध काय? पण यामागे एक खास पर्यावरणपूरक उपक्रम दडलेला आहे. बीसीसीआयने टाटा समूहासोबत मिळून 2023 पासून ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ची सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत आयपीएल सामन्यात टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 19 झाडं लावली जातात. विशेष म्हणजे प्लेऑफ सामन्यांमध्ये ही संख्या आणखी वाढते. प्लेऑफमध्ये प्रत्येक डॉट बॉलमागे तब्बल 500 झाडं लावली जातात.

उदाहरणार्थ, एखाद्या सामन्यात दोन्ही डाव मिळून 50 डॉट बॉल्स टाकल्या गेल्या, तर त्या बदल्यात 950 झाडं लावली जातात. त्यामुळे क्रिकेटसोबतच पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळत आहे.

आयपीएल 2026 मध्ये आतापर्यंत या मोहिमेद्वारे सुमारे 6 लाख झाडं लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गोलंदाजांचाही मोठा वाटा आहे. मोहम्मद सिराजने या हंगामात एकट्यानेच 109 डॉट बॉल्स टाकल्या आहेत. तर जोफ्रा आर्चर आणि कगिसो रबाडा यांनीही 100 हून अधिक डॉट बॉल्स टाकल्या आहेत. म्हणजे या तिघांमुळेच 6 हजारांपेक्षा अधिक झाडं लावली जाण्यास मदत झाली आहे. मोहम्मद शमी आणि अंशुल कंबोज यांनीसुद्धा यंदा भरपूर डॉट बॉल्स टाकल्या आहेत.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक डॉट बॉल्स टाकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टीन याच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना तब्बल 211 डॉट बॉल्स टाकल्या होत्या. मात्र त्या काळात बीसीसीआयचा हा हरित उपक्रम सुरू झाला नव्हता.

साधारणपणे एका आयपीएल हंगामात 3000 ते 5000 डॉट बॉल्स टाकल्या जातात. त्यामुळे बीसीसीआय दरवर्षी लाखो झाडं लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जगभर पोहोचवत आहे. क्रिकेटच्या रोमांचासोबतच हरित क्रांतीची ही अनोखी इनिंग चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.

हे ही वाचा –

IPL Most Runs First Over : सुरुवातीलाच विरोधकांचा गेम संपवला! IPL च्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 टीम्स

आणखी वाचा

Comments are closed.