राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात वाढवेल म्हणत शरद पवारांकडे गेले, विधान परिषद घेतली, अन् आता…
Gulabrao Patil on Eknath Khadse: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) रणधुमाळीत जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) येथे राजकीय नाट्य दिसून आले. एकेकाळी आपला बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ऐनवेळी असमर्थता दर्शवली. एकनाथ खडसे यांनी नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ‘आमच्याकडे उमेदवार नाहीत’ आणि ‘निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध नाही,’ असे सांगून अचानक निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला. तर एकनाथ खडसे हे त्यांच्या सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या दबावाखाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाष्य केले आहे.
गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर नगरपंचायतीत घेतलेल्या माघारीबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे केंद्रात भाजपच्या मंत्री आहेत. त्यांचे पॅनल निवडून यावे, यासाठी त्यांनी माघार घेणे स्वाभाविक आहे. खडसे सोयीचं राजकारण करतात. भुसावळमध्ये ते शिवसेना-भाजप विरुद्ध लढत आहेत. मग मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध लढायला काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
एकनाथ खडसेंवर गुलाबराव पाटील : आता मुक्ताईनगर में राष्ट्रवादी राहिली नाही
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाला उत्तर महाराष्ट्रात वाढवेल, असं सांगून एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधान परिषद घेतली. पण, आता मुक्ताईनगरमध्येच राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणावं लागेल, असा खोचक टोला देखील त्यांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे. आता गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Gulabrao Patil on Girish Mahajan: गिरीश महाजनांच्या खेळीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगर पालिकेच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी मोठी खेळी केली. भाजपच्या दोन उमेदवारांसमोर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन उमेदवार उभे होते. पण गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना माघार घ्यायला लावली. याबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, असं करणे योग्य नाही, शिवसेनेचे किंवा भाजपचे उमेदवार एकमेकांनी घेऊ नये, असे महाराष्ट्र स्तरावर ठरले आहे. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे. तिथली परिस्थिती समजून घ्यावी लागेल. एकमेकांचे कार्यकर्ते घेऊ नये, असे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे ठरलेले आहे. तरीही असे होत असेल तर हे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.