पुढच्या पाडव्यापर्यंत थेट राजकारणात सक्रीय होणार,गुणरत्न सदावर्ते यांची मोठी घोषणा


मुंबई : कधी आंदोलनं आणि कधी वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मोठी घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील एबीपी माझाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी लवकरच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आगामी पाडव्यापर्यंत राजकारणात सहभागी होणार असल्याची घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

gunaratna sadavarte : गुणरत्न सदावर्ते राजकारणात येणार

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, थोडा इंतजार करो, थोडासा, याच शोमध्ये पाडव्यानिमित्त ती घोषणा, राजकारणाबाबत नकारात्मक नाही, नक्की मी आशादायी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना वाहून घेतलेला माणूस आहे. त्याच्यामुळं मला ज्येष्ठ, गुरुवर्य ज्या क्षणाला सांगतील, राजकारणात थेट तुमची गरज आहे, नक्की डंके की चोट पे मी तुम्हाला राजकारणात दिसेल, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं.

राजकारणाला अस्पृश्य समजत नाही, ती एक यंत्रणा आहे. देशाचे स्तंभ आहेत त्यापैकी एक स्तंभ आहे. त्याच्यामुळं लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि येणाऱ्या पाडव्यापर्यंत राजकारणात येईन, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.

गुणरत्न सदावर्ते विविध कारणांमुळं चर्चेत

गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी 2018 मध्ये राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. याशिवाय उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची त्यानंतर संघटना उभी केली. एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची स्थापना केली. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलनं एसटी बँकेची निवडणूक जिंकली.

गुणरत्न सदावर्ते सातत्यानं चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी एसटी बँकेच्या सभेत सदावर्ते गटाच्या संचालकांमध्ये आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या गटाच्या संचालकांमध्ये वाद झाला होता.त्यानंतर त्या सभेत हाणामारी झाली होती.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते सध्या स्वत: राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, ते सातत्यानं राजकीय भूमिका घेताना पाहायला मिळतात. महाराष्ट्रात महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयांचं समर्थन करताना सदावर्ते दिसून येतात. काहीच दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ही टीका करत असताना गुणरत्न सदावर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बचाव करताना पाहायला मिळाले होते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.