आंबा नुकसानीचा अहवाल तातडीने सरकारला पाठवा, बागायतदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
हवामानातील बदलामुळे यंदा आंबा पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पाऊस आणि अनियमित थंडीमुळे आंब्याला अपेक्षित मोहर आला नाही. त्यानंतर प्रचंड तापमानामुळे ८० टक्के मोहर काळा पडून गळला. त्यामुळे ८० टक्के आंबा पीक बागायतदारांच्या हातून निसटून गेले. आंबा बागायतदारांच्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाने तातडीने सरकारला द्यावा अशी मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था,रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था,पावस परिसर आंबा उत्पादक संस्था,आडिवरे मंगलमूर्ती संघ आणि करबुडे रवळनाथ संघ यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात २०१५ पासून आंबा बागायतदारांचे नुकसान होत आहे. त्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही त्यांना ती त्वरित कर्जमाफी देण्यात यावी. २०१५ पासून ज्यांनी कर्ज भरले आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा. कर्जमाफी जाहिर करताना शेतकऱ्यांची थट्टा करू नये. बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रकाश साळवी व इतर शेतकरी उपस्थित होते.
Comments are closed.