शेतात शौचास गेल्याच्या कारणावरुन परप्रांतीय मजुराला मारहाण, मजुराचा जागीच मृत्यू, गुन्हा दाखल

लातूर क्राईम न्यूज : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. वानवडा शिवारात शेतात शौचास गेल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका परप्रांतीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी औसा पोलिसांनी शेतमालक बाळासाहेब वसंत माने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. संदीप रामनाथ गौंड वय 19 रा. दुधोनिया, ता. हिलगन, जि. सागर, मध्यप्रदेश असं मृत मजुराचे नाव आहे.

लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, औसा-तुळजापूर महामार्गालगत सुरू असलेल्या सीएनजी गॅस पाईपलाईन प्रकल्पावर तो मजूर म्हणून काम करत होता. आज संदीप गौंड हा प्रातर्विधीसाठी शेतमालक बाळासाहेब माने यांच्या उसाच्या शेतात गेला होता. ठिबक सिंचन व्यवस्था घाण झाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या माने यांनी त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोक्यावर आणि मानेजवळ गंभीर मार लागल्याने संदीप बेशुद्ध पडला. त्याच्यासोबत असलेल्या यशवंत ठाकूर यालाही मारहाण झाल्याची माहिती आहे. गंभीर जखमी अवस्थेतील संदीपला औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ओनिक्या इन्फ्रा प्रा. लि., पुणेचे व्यवस्थापक राजेश हडवळे यांच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात बाळासाहेब माने यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

युवकांच्या दोन गटातील वाद सोडवण्यास गेलेल्या पोलिसाला तरुणांनी मारहाण केली

बेळगावात युवकांच्या दोन गटातील वाद सोडवण्यास गेलेल्या पोलिसाला तरुणांनी मारहाण केल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घडली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर दोन युवकांच्या गटात हाणामारी सुरु होती. यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या मल्लिकार्जुन गुंजीकर या पोलीसाने तेथे धाव घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांनी पोलीसाच्या अंगावर धाव घेऊन पोलिसाला मारहाण केली. मार्केट पोलीसांना ही घटना कळताच पोलीस अधिकारी आणि पोलिसांनी तेथे धाव घेऊन पोलीसाला मारहाण करणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले.

अहिल्यानगर येथील नगर-कल्याण रोडवरील जाधव मळा परिसरात एका तरुणाची हत्या

अहिल्यानगर येथील नगर-कल्याण रोडवरील जाधव मळा परिसरात एका 30 वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करण्यात आली. लक्ष्मण उर्फ लक्षा मार्तंड काळे असे मयताचे नाव आहे. मयत लक्ष्मण हा पत्नी रूपाली काळे यांच्यासह मेव्हण्याच्या घरी कामानिम्मित राहण्यास होता. मध्यरात्री सर्व कुटुंबीय झोपलेले असताना अज्ञात इसमाने घरात घुसून लक्ष्मण यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांना जीवे मारले. तसेच फिर्यादी पत्नीवरही वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी सांगितले.

Comments are closed.