हरभजनला सीआरपीएफ कमांडोंकडून सुरक्षा मिळते
आप’मधून भाजपमध्ये आलेल्या अन्य खासदारांनाही सुरक्षा :
वृत्तसंस्था/ चंदीगड
केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांच्यावरून मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारकडून सुरक्षा मागे घेण्यात आल्याच्या काही तासातच केंद्र सरकारने हरभजन यांना सीआरपीएफची सुरक्षा पुरविली आहे. आता हरभजन यांना दिल्ली आणि पंजाब दोन्ही ठिकाणी सीआरपीएफच्या कमांडोंकडून सुरक्षा प्राप्त होणार आहे.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार हरभजन यांच्यासोबत आम आदमी पक्षातून भाजपमध्ये आलेले अन्य खासदार संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाति मालिवाल, राजेंद्र गुप्ता आणि विक्रमजीत साहनी यांनाही केंद्रीय सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना आता सीआरपीएफचे कमांडो सुरक्षा प्रदान करणार आहेत. हे पाऊल या नेत्यांना वाढता धोका आणि पंजाबमध्ये त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर होत असलेल्या निदर्शनांना पाहून उचलण्यात आले आहे.
पंजाब सरकारने हटविली होती सुरक्षा
यापूर्वी पंजाबच्या भगवंत मान सरकारने रविवारीच हरभजन यांची झेड प्लस श्रेणीची सुरक्षा हटविली होती. हरभजन यांच्या निवासस्थानी तैनात 9-10 सुरक्षा कर्मचारी आणि शासकी वाहने परत बोलाविण्यात आली होती. याची पुष्टी हरभज यांचे पीए मनदीप सिंह यांनी दिली होती.
निवासस्थानाबाहेर गोंधळ
हरभजन यांच्या निवासस्थानाबाहेर शनिवारी गोंधळ झाला होता आणि निदर्शकांनी भिंतीवर ‘पंजाबचा गद्दार’ असे लिहिले होते. या निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नव्हता असे एका व्हिडिओतून स्पष्ट झाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्ष सोडणाऱ्या खासदारांवर थेट हल्ला करत त्यांना ‘गद्दार’ संबोधिले आहे.
Comments are closed.