INDvsPAK: एकटा हर्षित राणा भारी! पाकिस्तानी खेळाडूंना भिडला, सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

दोहा येथे सुरू असलेल्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत आज (२२ नोव्हेंबर) आठवा सामना भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात खेळला जात आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांच्याविरुद्ध अप्रतिम फटकेबाजी करत पाकिस्तानने सामन्याची सुरूवात चांगली केली. भारताला पहिली विकेट मिळवण्यासाठी खूपच परिश्रम करावे लागले. त्यादरम्यान हर्षित आणि पाकिस्तानी फलंदाजांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

हर्षितने गोलंदाजीला सुरूवात केली. त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर शामिल हुसेनने चौकार मारला. शामिल तेवढ्यावरच थांबला नाही आणि त्याने दुसऱ्या चेंडूवर थेट षटकार ठोकला. त्याची ही फटकेबाजी प्रिन्स यादवच्याही षटकात सुरूच राहिली. शामिलला माझ सदाकतनेही चांगली साथ दिली. सदाकतनेही हर्षित आणि प्रिन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. सातव्या षटकात हर्षित आणि दोन्ही पाकिस्तानी फलंदाज भिडले, ज्यामुळे पंचांना हस्तक्षेप करावा लागला. त्या पूर्ण षटकामध्ये हर्षित आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये वाद सुरूच राहिला. त्याच्या पुढच्या षटकात जे घडले, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात हर्षितला त्याच्या पुढच्याच षटकात विकेट मिळाली. पाकिस्तानच्या डावातील ९वे षटक हर्षितने टाकले आणि रोहेल नझीर क्रिजवर होता. त्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहेल पायचीत झाला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनकडे गेला. त्यालाही हर्षितने छाती ठोकत निरोप दिला.

या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांनी या सामन्याआधी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. भारताने नेपाळविरुद्धचा सामना ३०६ धावांनी जिंकला, तर पाकिस्तानने युएईला ६१ धावांनी पराभूत केले. भारत ग्रुप ब च्या गुणतालिकेत भल्यामोठ्या रनरेटसह (+६.१२०) पहिल्या स्थानावर आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व तिलक वर्मा करत आहे.

(INDvsPAK एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये झेल घेतल्यानंतर हर्षित राणाने शामील हुसेनला आक्रमक पाठवले)

Comments are closed.