64 घरांच्या खेळात हिंदुस्थानी खेळाडूंची कोट्यवधींची उड्डाणे; प्रज्ञानंद अव्वल, टॉप-100 मध्ये 12 हिंदुस्थानींचा समावेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बुद्धिबळाच्या पटावर समोरच्याला चितपट करणाऱ्या चाली खेळून भल्याभल्या खेळाडूंना घाम फोडणारा हिंदुस्थानचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद हा 2026 या वर्षात जगातील सर्वाधिक कमाई करणारा बुद्धिबळपटू ठरला आहे. ‘वर्ल्ड चेस’ने यासंदर्भात अधिकृत आकडेवारी जाहीर केली असून प्रज्ञानंदच्या कमाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत 132 टक्यांनी घसघशीतत वाढ झाली आहे. यामध्ये ‘ग्रँड चेस टूर फायनल्स’मध्ये जिंकलेले 2 लाख डॉलर्स हे त्याचे यंदाचे सर्वात मोठे बक्षीस ठरले आहे.

आर. प्रज्ञानंदच्या एकंदरीत वर्षभरातील कामगिरीचा विचार करता त्याने 13 स्पर्धांमधून तब्बल 6,66,229 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 6.17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच त्याने या बाबतीत अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाला 1,903 डॉलर्सच्या फरकाने मागे टाकले आहे. मात्र, प्रज्ञानंदचा पहिला क्रमांक हिंदुस्थानचा विश्वविजेता डी.गुकेश काबीज करण्याची दाट शक्यता आहे. 24 नोव्हेंबरपासून जिनिव्हा येथे जावोखिर सिंदारोव्हविरुद्ध होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद लढतीत तब्बल 2.5 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस आहे. फिडेच्या नियमांनुसार, या लढतीतील विजेत्याला किमान 1.25 दशलक्ष डॉलर्स मिळतील, ज्यामुळे सिंदारोव्हचा पराभव केल्यास गुकेश थेट 48 व्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेईल. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील अव्वल 100 बुद्धिबळपटूंमध्ये तब्बल 12 हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये लिऑन ल्यूक मेंडोन्सा 97,612 डॉलर्ससह 26 व्या स्थानावर असून, त्याची कमाई गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास चौपट झाली आहे. तसेच, हिंदुस्थानी महिला बुद्धिबळपटूंमध्ये दिव्या देशमुख (78,186 डॉलर्ससह 30 वे स्थान) आणि कोनेरू हम्पी (56,760 डॉलर्ससह 38 वे स्थान) यांनी सर्वाधिक कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Comments are closed.