काँग्रेसमध्ये ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ मोहीम तीव्र! हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षांतर्गत विरोधकांची
हर्षवर्धन सपकाळ: महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात मोठी मोट बांधण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यातील नाराजांचा हा मोठा गट येत्या 8 जून रोजी दिल्लीत जाऊन थेट काँग्रेस हायकमांडची (Congress High Command) भेट घेणार असून, ‘प्रदेशाध्यक्ष बदला’ अशी थेट मागणी लावून धरणार आहे.
Harshvardhan Sapkal: 8 जूनला दिल्लीत हायव्होल्टेज बैठक; 4 ते 5 आमदारांचा सहभाग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर नाराज असलेला हा गट 8 जून रोजी नवी दिल्लीत दाखल होईल. तिथे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात राज्यातील काँग्रेसचे 4 ते 5 विद्यमान आमदार (MLAs) आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती असून, या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Harshvardhan Sapkal: जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीवरून पक्षात खदखद
या अंतर्गत बंडाचे मुख्य कारण पक्षात काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेले ‘संघटन सृजन अभियान’ असल्याचे बोलले जात आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात नवीन शहराध्यक्ष (City Presidents) आणि जिल्हाध्यक्षांच्या (District Presidents) नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या निवडी करताना स्थानिक नेत्यांना आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही, असा थेट आरोप नाराज गटाकडून केला जात आहे. या निवडींमध्ये चुकीच्या पद्धती अवलंबल्या गेल्याने पक्षात मोठी खदखद निर्माण झाली आहे.
Harshvardhan Sapkal: मोठ्या नेत्यांकडून ‘पडद्यामागून’ सूत्रे हलवण्याची शक्यता
सध्या ही मोहीम उघडपणे काही पदाधिकारी चालवत असल्याचे दिसत असले, तरी या ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ मोहिमेच्या मागे राज्यातील काही अत्यंत वजनदार आणि बड्या काँग्रेस नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत संघटनात्मक पातळीवरील हा वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात आणि 8 जूनच्या बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत काय निर्णय घेतला जातो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.