Mumbai Heat Wave – मुंबईत उष्णतेची लाट, पारा 38 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईत उष्णतेची लाट धडकली असून, नागरिकांची भर दुपारी उन्हात चालताना प्रचंड दमछाक होत आहे. शहराचा पारा मागील दोन दिवसांपासून उच्चांकी पातळीवर असून शुक्रवारी थेट 38 अंशांवर पारा गेला. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. पुढील आठवडाभर शहरात उष्णतेचा कहर अनुभवायला मिळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याचवेळी नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान शास्त्रज्ञांकडून करण्यात आले आहे.

मुंबईत आज उष्णतेची लाट असून, उद्या तापमानात काही प्रमाणात घट होईल. पुढील काही दिवस सरासरीपेक्षा अधिकच राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेतील हवामान शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात दुपारच्या वेळी उष्णतेत तीव्र वाढ होईल. हवामानातील हा बदल आणि तीव्र उष्णता लक्षात घेता, नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचा आणि आवश्यकता नसल्यास उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यातही ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेमुळे बागा सुकत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून परतला आहे. ऑक्टोबरमधील उष्णतेची लाट आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Comments are closed.