राँग साईडने गाडी दामटली; भाजप खासदार सवरा यांच्या कारला डंपरची धडक, मुंबईहून पालघरकडे जाताना अपघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी वाहतूककोंडी टाळण्यासाठी त्यांची गाडी राँग साईडने दामटली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. सवरा मुंबईहून पालघरकडे निघाले होते. मात्र वाहतूककोंडीमुळे त्यांनी चालकाला गाडी राँग साईडने घेण्यास सांगितली. या घटनेनंतर सुदैवाने वेळीच एअरबॅग उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि या अपघातात सवरा बालंबाल बचावले.

मुंबई–अहमदाबाद मार्गावर वाहनचालकांना ट्रॅफिक कोंडीचा रोजच सामना करावा लागतो. त्याचा फटका खासदार सवरा यांनाही बसला. सवरा आज सकाळी कुटुंबासह मुंबईहून पालघरकडे निघाले होते. परंतु गुजरात मार्गिकेवर वाहतूककोंडी असल्याने त्यांच्या चालकाने गाडी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर राँग साईडने दामटली. त्यात समोरून येणाऱ्या डंपरने सवरा यांच्या कारला धडक दिली.

काहीकाळ वाहतूककोंडी
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली.

Comments are closed.