आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार: प्रवाशांच्या खिशाला कात्री
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या एसटी अर्थात लालपरीचा प्रवास मंगळवारी मध्यरात्रीपासून महागणार आहे. प्रवाशांना 10 टक्क्यांच्या हंगामी भाडेवाढीबरोबरच स्वच्छता अधिभाराच्या दोन रुपयांच्या अतिरिक्त रक्कमेचा भार सोसावा लागणार आहे. ऐन उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत झालेल्या या भाडेवाढीने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
उन्हाळी सुट्टीत एसटी तिकीट दरात 10 टक्क्यांची भाडेवाढ जाहीर करण्यात होती. ही हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून 15 जूनपर्यंत लागू होणार आहे. त्यामुळे एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना आता प्रत्येक टप्प्यात 12 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही भाडेवाढ केवळ साध्या बसेससाठी लागू राहणार आहे. म्हणजेच भाडेवाढीचा आर्थिक फटका सामान्य माणसालाच बसणार आहे. याशिवाय प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा कायमस्वरुपी स्वच्छता अधिभार आकारला जाणार आहे.
हंगामी भाडेवाढ आणि कायमस्वरूपी स्वच्छता अधिभार याचा एकाचवेळी लागू झाल्यामुळे प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे. यामुळे राज्यभरातील लालपरीच्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Comments are closed.