हिंगोली: आई ‘आय एम सॉरी’; व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर ‘नीट’ विद्यार्थ्याने संपवले जीवन
नुकतीच ‘नीट-यूजी’ (NEET-UG) फेरपरीक्षा दिलेल्या महाराष्ट्रातील हिंगोली येथील एका १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्या मोबाईल फोनवर आईसाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर आपले जीवन संपवले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
सुशील ढगे याने उचललेल्या या टोकाच्या पावलाचा राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेशी काही संबंध होता का, याचा तपास केला जात आहे; दरम्यान, त्याला फेरपरीक्षेचा पेपर कठीण गेला होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे, असे त्यांनी सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
हिंगोली शहरातील अष्टविनायक नगर भागात राहणाऱ्या १८ वर्षीय ढगे याने बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका विहिरीत उडी घेतली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने पत्रकारांना दिली. आत्महत्या करण्यापूर्वी सुशीलने आपल्या आईची माफी मागणारा ३३ सेकंदांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, असे त्यांनी सांगितले.
‘मी माझे जीवन संपवण्यासाठी जात आहे, आणि तू (आई) टेन्शन घेऊ नकोस. पुढील जन्मातही मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. सुमेधसोबत राहा. आय एम सॉरी,’ अशा शब्दांत सुशीलने या क्लिपमध्ये संदेश दिला असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
ढगे याला ‘नीट’ची फेर परीक्षा कठीण गेल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सध्या या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ शी बोलताना सांगितले की, ‘कुटुंबीयांच्या तक्रारीत नीट फेर परीक्षेचा उल्लेख आहे. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून परीक्षा आणि या घटनेचा काही संबंध आहे का, हे तपासत आहोत.’
प्रश्नपत्रिका फुटीच्या सुरू असलेल्या तपासामुळे आधीची ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर, एनटीए (NTA) द्वारे २१ जून रोजी ‘नीट’ची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेला २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार होते.
Comments are closed.