गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले,

मुंबई: आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता शहरातील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्याने शहरातील हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. सध्या काही हॉटेल्सकडे असलेल्या शिल्लक गॅस साठ्चावर व्यवसाय सुरू असला, तरी परिस्थिती कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत सुमारे २० टक्के हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, गॅसचा तुटवडा आहे हे मान्य आहे, मात्र जगात हाहाकार सुरू आहे. पाकिस्तानात आज काय चाललंय तुम्हालाही माहिती आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला आणि गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवलेलं आहे. ⁠त्यात त्यांनी एलपीजी गॅस निर्माण करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा ही प्राथमिकता देण्याचे आदेश केंद्र सरकारचे आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय संदर्भात आम्ही काहीही करू शकत नाही. हॉटेल व्यवसायिकांना केरोसीन वापरण्याचं आम्ही आवाहन केलं होतं, मात्र आमच्या सर्व यंत्रांना बदलाव्या लागतील असं त्यांनी सांगितलं आहे, गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी आम्ही सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत. प्रत्येक विक्रेत्याची कसून चौकशी करा असेही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जगाच्या समोर हा प्रश्न आहे त्यामुळे आपण त्याला काहीही करू शकत नाही, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगा

घरगुती गॅससाठी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन करून देखील कोल्हापुरात दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडर मिळावा म्हणून नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही अफवांवर विश्वास ठेवून गॅस सिलेंडर साठी गर्दी करू नये. शिवाय जिल्ह्यात कुणीही अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना व्यावसायिक गॅस देण्यात येत आहे. हॉटेल्स आणि इतरांसाठी व्यवसायिक गॅस सिलेंडर देणे बंद केला आहे. मात्र कुणीही अतिरिक्त बेकायदेशीर रित्या साठा करू नये अशा सूचना जिल्हाधिकार्‍यानी दिल्या आहेत.

सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या रांगा

सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग लागली आहे. इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवाड्याची भीती लोकांच्या मनात आहे. पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने ग्राहक ‘पॅनिक बुकिंग‘ करतायत. अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस कंपनीच्या ओनलाईन बुकिंग पद्धतीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे नागरिक स्वतःच गॅस घेऊन एजन्सीमध्ये येत आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.