हिटमॅन शर्माला वनडे वर्ल्डकपमध्ये संधी मिळेल का? कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मागील 15 वनडे सामन्यांतील आकडे काय सांगतात?

रोहित शर्माच्या (Rohit Sharma Odi Future) वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान आलेल्या एका रिपोर्टमध्ये रोहितला 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या योजनांमध्ये स्थान नसल्याचे सांगण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, बीसीसीआयने या वृत्तांचे खंडन केले होते. त्यानंतर लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात रोहितने शतक झळकावले होते.
2027 च्या वनडे विश्वचषकाच्या (Odi WC 2027) वेळी रोहित शर्मा 40 वर्षांचा असेल. त्यामुळे तो विश्वचषक खेळणार की नाही, हे त्याची फिटनेस आणि फॉर्म यावर अवलंबून असेल. मात्र, रोहितबाबत सातत्याने येत असलेल्या चर्चांमुळे तो स्वतःच निवृत्तीची घोषणा करणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. एका कार्यक्रमात त्याला पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळणार का, असे विचारण्यात आले होते. त्यावर रोहितने सांगितले की, “अजून त्याला वेळ आहे, तेव्हा पाहू.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवून शुबमन गिलकडे (Shubman Gill) वनडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. मात्र, रोहितला संघात स्थान मिळत राहिले. तेव्हापासून त्याच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहितने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्माने भारतासाठी 15 वनडे सामने खेळले आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम खेळी नुकत्याच झालेल्या सामन्यात आली. लॉर्ड्सवर त्याने 138 धावांची खेळी केली होती. याशिवाय या 15 डावांमध्ये त्याने आणखी एक शतक झळकावले असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे 121 धावा केल्या होत्या. तसेच त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत.
या 15 डावांमध्ये रोहितने एकूण 727 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 2026 मधील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, रोहितने 9 वनडे डावांमध्ये 42.11 च्या सरासरीने 379 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 99.21 इतका राहिला आहे.
Comments are closed.