आयपीएल 2027 लिलाव परदेशात नाही तर भारतातच! 3 वर्षांनंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय

वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वात मोठी फ्रँचायझी आधारित टी-20 लीग, म्हणजेच ‘इंडियन प्रीमियर लीग’चा (IPL) पुढील हंगाम 2027 मध्ये आयोजित केला जाणार आहे, ज्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आतापासूनच याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये आयपीएल 2027 च्या हंगामासाठी होणाऱ्या मिनी प्लेयर ऑक्शनच्या आयोजनाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, यावेळी हा लिलाव परदेशात आयोजित केला जाणार नाही. गेल्या काही हंगामांपासून खेळाडूंचा लिलाव परदेशात आयोजित केला जात होता, मात्र बीसीसीआयने आता या हंगामासाठी तो भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

​आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची (15 सप्टेंबर) रोजी बैठक पार पडली. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, 2023 मध्ये कोची येथे झालेल्या लिलावानंतर आता 2027 च्या आयपीएल हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव भारतात आयोजित केला जाईल. गेल्या काही वर्षांत हा कार्यक्रम दुबई, जेद्दा आणि अबुधाबी यांसारख्या परदेशांमध्ये आयोजित केला जात होता. मात्र, ही एक मिनी-ऑक्शन असल्याने बीसीसीआय आणि आयपीएलने लिलाव पुन्हा भारतातच घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पुढील वर्षी होणारा मेगा प्लेयर ऑक्शन पुन्हा एकदा परदेशात आयोजित केला जाऊ शकतो. मिनी लिलावासाठी आपल्या प्रतिनिधी मंडळाला परदेशात नेताना येणाऱ्या लॉजिस्टिकल आणि ऑपरेशनल आव्हानांबद्दल फ्रँचायझींनी चिंता व्यक्त केली होती; त्यामुळे त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार हा मिनी लिलाव भारतात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​मिनी प्लेयर ऑक्शनच्या आयोजनाव्यतिरिक्त पुढील हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम राहणार की नाही, यावरही गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र, या नियमाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गव्हर्निंग कौन्सिलच्या पुढील बैठकीत या नियमावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वतीने या नियमाबाबत सर्व फ्रँचायझींकडून मते मागवण्यात आली होती, जी त्यांनी सादर केली आहेत.

Comments are closed.