कोयनेचे समुद्रात वाहून जाणारे पाणी कोकणासह दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला द्या; माजी खासदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोयना धरणातून समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते पाणी कोकणासह महाराष्ट्रातील अन्य दुष्काळग्रस्त भागांना उपलब्ध करून द्यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यंदा पावसाच्या कमतरतेमुळे कोकणातील भातशेती आणि कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका बाजूला कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी समुद्रात वाहून जाते, तर दुसरीकडे पावसाच्या खंडामुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. या विसंगतीवर मात करण्यासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन करण्याची गरज दलवाई यांनी अधोरेखित केली आहे.

कोयना धरणातून वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी पुढे कोकणातील नद्यांमार्गे समुद्राला मिळते. या पाण्याचा योग्य अभ्यास करून शक्य तेवढे पाणी कोकणातील पाणीटंचाईग्रस्त भागांसह महाराष्ट्राच्या अन्य दुष्काळग्रस्त भागांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने दीर्घकालीन योजना आखावी, अशी मागणी दलवाई यांनी केली आहे. यासाठी तांत्रिक व्यवहार्यता, जलसाठवण क्षमता आणि पाणीवाटपाचे नियोजन यांचा सखोल अभ्यास करून ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

कोकणातील अतिरिक्त पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास पाणीटंचाईच्या काळात त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील पाणीटंचाईग्रस्त गावे आणि दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटले आहे.पावसाच्या कमतरतेमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलव्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करावे, अशी मागणीही दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोयनेच्या समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा अधिकाधिक लोकहितासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.