मी शिवसेना देशद्रोह्यांच्या हाती देणार नाही!
पद सोडेन पण स्वाभिमानाशी तडजोड नाही : – उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिनी हुंकार
टी.बी. प्रतिनिधी, मुंबई:
‘शिवसेना ही कोणत्याही सत्तेसाठी जन्माला आलेली संघटना नाही. मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा अस्मितेचा लढा लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर मी आजच पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे. पण सोन्यासारखी शिवसेना गद्दारांच्या, लाचारांच्या आणि स्वार्थासाठी पक्ष विकणाऱ्याच्या हाती कधीही देणार नाही,’ असा हुंकार देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारांवर ठाकरी भाषेत आसूड ओढला.
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. ठाकरेंच्या सेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे या मेळाव्याला वेगळे वलय निर्माण झाले होते. मात्र, या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संकटामागून संकटे आली तरी संकटाला पुरुन उरणारा शिवसैनिक असेपर्यंत आपण कोणालाही घाबरत नाही, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच शिवसैनिकांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. भाषणाच्या सुरुवातीलाच बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण करून देत उद्धव म्हणाले, आणीबाणीच्या काळात आणि त्यानंतर शिवसेनेवर अनेक प्रकारचे दबाव आले. रजनी पटेल यांनी शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी लेखी प्रस्ताव आणला होता. मात्र बाळासाहेबांनी तो प्रस्ताव फाडून फेकला आणि ‘शिवसेना संपेल, पण झुकणार नाही,’ असा संदेश दिला. आज काहीजण शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा अपप्रचार करीत आहेत. पण शिवसेनेची तीस वर्षे भाजपसोबत युती होती. इतकी वर्षे भाजपसोबत राहून भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विषय चुकीचा असून उलट भाजपच शिंदे सेनेतच सामील होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मी पदाचा लोभी नाही
स्वत:वर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, ‘माझ्यावर विश्वास नसेल तर मी आजच पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे. मला पदाची हाव नाही. मुख्यमंत्रीपदही मी सोडले. पण स्वाभिमान विकला नाही. माझी एकच अट आहे, शिवसेना गद्दारांच्या हातात जाता कामा नये, असे सांगतानाच ‘आज निर्णय तुमच्या हातात आहे. माझ्यावर विश्वास असेल तर आपण नव्या जोमाने लढू. विश्वास नसेल तर मी बाजूला होईन. पण बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना गद्दारांच्या हाती कधीही जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत असेपर्यंत शिवसेना जिवंत राहील आणि हा लढा सुरूच राहील, अशा ठाकरी शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली.
‘ऑपरेशन कमळ’ राबवावे लागेल
देशातील फोडाफोडीच्या राजकारणावर सडकून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जनतेने एका पक्षाला मत द्यायचे आणि निवडून आलेला आमदार किंवा खासदार दुसऱ्याच पक्षात जाणार असेल, तर निवडणुकांचा अर्थच काय उरतो?, असा सवाल करत ज्यापद्धतीने राजकारण चालले आहे, त्यावरून जनतेचा विश्वास उडत चालला आहे. आज देश ‘वन नेशन, वन इलेक्शन’ नव्हे, तर ‘वन पार्टी, नो इलेक्शन’च्या दिशेने ढकलला जात आहे. सत्तेच्या जोरावर विरोधी पक्ष संपविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यांचे लोकप्रतिनिधी पळविणे आणि निवडणुकांशिवाय सत्ता मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. हे असेच होणार असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून ‘ऑपरेशन कमळ’ करावे लागेल. कारण देश अराजकतेकडे चालला आहे, अशी भीतीही ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.
गद्दारांना जाब विचारा
शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे कडाडले. निवडणूकीत म्हणायचे मोदींच्या जीवावर निवडून आले होते. पण आताची निवडणूक तर आमचीच होती. समोरुन पैशांचे धबधबे होते. पण हे गोरगरीब, कष्टकरी-शेतकऱ्यांच्या मदतीवर निवडून आले. तुम्ही यांना निवडून आणलेत. मग आता कुठल्या आदेशाची वाट बघताय. आदेश तर बाळासाहेबांनी कधीचाच दिला आहे, असे सांगत या गद्दारांना जाऊन जाब विचारा, असा आदेशच त्यांनी शिवसैनिकांना दिला.
शिवसेनेचे आमदार, खासदार फुटीवर बोलताना ठाकरे म्हणाले, यापुढे शिवसेना निवडणूकच लढविणार नाही असे धरून चालूया. मग काय करणार तुम्ही. कारण मर मर मेहनत तुम्ही करायची. यांना निवडून तुम्ही आणायचे आणि यांना खोक्यावर खोके, शेतकऱ्याला हमी भाव नाही, पण आमदार- खासदाराचा हमी भाव ठरला आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने असे छळले नाही
काँग्रेसने पण आपल्याला छळलेच. अर्ध्याहून अधिक आयुष्य काँग्रेससोबतच्या वैरात गेले. अगदी टोकाचे वैर. भाजपसाठी काँग्रेसवर टीका केली. बाबरी पाडल्यानंतर हे भाजपावाले पळून गेले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख उभे राहिले होते. काँग्रेसने पण आपली माणसे फोडली पण काँग्रेसने त्यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केले नाही. काँग्रेसने आपल्याला असे छळले नाही. काँग्रेसने मातोश्रीवर डोळे वटारून बघितले नव्हते. पण भाजपा आज शिवसेना उखडून टाकायला निघाला आहे. हा फरक आहे तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये असेही भाजपला उद्देशून ठाकरे म्हणाले.
तरुणांमध्ये क्रांतीची ताकद
देशातील तरुणांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, तरुणांना या देशात झुरळ म्हटले जाते. पण याच वयोगटातील मुलांनी क्रांती करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्य निवडणुका जिंकून मिळाले नाही. खुदीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, अनंत कान्हेरे यांसारख्या तरुणांनी बलिदान दिल्यामुळे देश स्वतंत्र झाला. आजच्या तरुणांनाही लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी पुढे यावे लागेल. तरुण पेटले तर कोणतीही सत्ता टिकू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
Comments are closed.