इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक! आता उरलेल्या 3 जागांसाठी रंगणार महासंग्राम

ICC Women’s T20 World Cup 2026: यजमान इंग्लंडने वेस्ट इंडिजला धूळ चारुन आयसीसी महिला टी20 विश्वचषकाचे सेमीफायनलचे तिकीट पक्के केले आहे, स्पर्धेतील 22व्या सामन्यात यजमान संघाने वेस्ट इंडिजचा 38 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लड संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. इंग्लंड संघ गट -ब मध्ये पहिल्या स्थानवर विराजमान आहे. आता 3 जागेसाठी 7 संघात लढत सुरु आहे. आज (25 जून) भारत विरुद्ध बांग्लादेश सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरा अश्या स्थितीत आहे. जर या सामन्यात टीम इंडियाला पराभवास समोरे जावे लागले, तर त्यांचा विश्वचषकातील प्रवास संपेल, तर विजय मिळवल्या संघ सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहील.

सेमीफायनलच्या शर्यतीत भारताशिवाय 4 वेळची चॅम्पियन ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका, बांग्लादेश, वेस्टइंडीज, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ आहेत.

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टाॅस गमावून पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने आपल्या मर्यादित 20 षटकात 7 विकेट गमावून 186 धावा केल्या, ज्यामध्ये संघाची डॅनी वायट-हॉज चमकली तिच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने समाधानकारक लक्ष्य ठेवले. तिने 65 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 8 चाैकारांचा समावेश होता. शिवाय हेदर नाइटने देखील 26 चेंडूंत 43 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकारांचा समावेश होता.

187 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिच संघाची सुरुवात खराब झाली. पाॅवरप्लेमध्ये संघाचे 46 धावांत 2 विकेट्स गेल्या, ज्यामध्ये कर्णधार हिली मॅथ्यूजचा समावेश होता, मॅथ्यूजच्या बाद होण्यावरून मोठा गदारोळ झाला; इंग्लंडने डीआरएस (DRS) घेतला होता आणि बॅट व चेंडू यांच्यात स्पष्ट अंतर असूनही स्निकोमीटरवर स्पाइक दिसल्यामुळे थर्ड अंपायरने तिला बाद ठरवले.

चिनेल हेन्रीने डावाच्या अखेरीस 30 चेंडूंत नाबाद 51 धावांची खेळी केली, परंतु तिला आपल्या संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. वेस्ट इंडीजला 20 षटकांत 5 बाद 148 धावा करता आल्या.

वेस्ट इंडीजचा अखेरचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार असून, उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी ते हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. जर वेस्ट इंडीजने पात्रता मिळवली, तर न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या आशा मावळतील. न्यूझीलंड हा गतविजेता संघ आहे, परंतु या स्पर्धेतील त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे; त्यांना सुरुवातीच्या दोन सामन्यांत वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला.

Comments are closed.