वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंड दौऱ्यात स्वतंत्र ड्रेसिंग रूम !
हिंदुस्थानी संघासोबत इंग्लंडच्या स्वारीवर गेलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला आगामी टी-२० क्रिकेट मालिकेदरम्यान सहकाऱ्यांपासून वेगळी ड्रेसिंग रूम वापरावी लागणार आहे. १६ वर्षांखालील खेळाडूंसाठी लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्या सुरक्षा व संरक्षण नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
वैभव सूर्यवंशीला सामन्यांदरम्यान संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश, संघबैठका आणि चर्चामध्ये सहभागी होण्याची परवानगी असेल. मात्र, पाचही मैदानांवर कपडे बदलण्यासाठी त्याला स्वतंत्र ड्रेसिंग रूमचा वापर करावा लागेल. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्येही हा नियम लागू होणार का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
ईसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ‘हा आयसीसीच्या अखत्यारीतील स्पर्धात्मक दौरा असल्याने त्यांची सुरक्षा प्रक्रिया लागू आहे. स्पर्धेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही सुरक्षाविषयक बाबी आयसीसीकडून हाताळल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ईसीबीची ‘सेफ हँड्स’ धोरणेही कायम लागू राहतील.’
ईसीबीच्या क्रिकेट रेग्युलेटरने हिंदुस्थानी संघाच्या टीम लायझन अधिकाऱ्याशी संपर्क साधून सूर्यवंशीसाठी आवश्यक असलेल्या नियम, अपेक्षा आणि सुरक्षा व्यवस्थांबाबत चर्चा सुरू केली आहे. संबंधित सर्व मैदानांवरील सुरक्षा अधिकाऱ्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करण्यात आले असून जोखीम मूल्यांकनाच्या आधारे सर्व व्यवस्था निश्चित केल्या जात आहेत. सूर्यवंशीचे पालक संपूर्ण दौऱ्यात त्याच्यासोबत असणार असल्याची माहितीही ईसीबीने दिली आहे. त्याचे आई-वडील त्याच हॉटेलमध्ये राहणार असून सूर्यवंशीचे वय वे वय लक्षात घेता विशेष परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे खेळाडूला आवश्यक कौटुंबिक आधार आणि देखभाल मिळेल, असा विश्वास ईसीबीने व्यक्त केला.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यापूर्वीच सूर्यवंशीसोबत त्याचे पालक दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या प्रवास व निवासाचा खर्च बीसीसीआय उचलणार आहे.
Comments are closed.