हिंदुस्थानसाठी डावे ठरणार उजवे, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल यांनी सांगितली पहिल्या कसोटीची रणनीती
पहिल्या कसोटी सामन्याला आता फक्त काही तास उरलेले आहेत. हिंदुस्थानच्या संघाने लंकादहन करण्याची रणनीती ठरवलेली आहे. हिंदुस्थानला जर श्रीलंकेला पराभूत करायचे असेल तर त्यांच्यासाठी डावे हे उजवे ठरू शकतात, असे संकेत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी संकेत दिले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हिंदुस्थान तीन डावखुरे फिरकी गोलंदाज खेळवू शकतो. कारण कुलदीप यादव, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे गोलंदाजीतील वेगवेगळे प्रकार आणि बळी घेण्याची क्षमता आहे, असे मॉर्केल यांना वाटत आहे.
कुलदीपचा अनुभव महत्त्वाचा
मॉर्केल यांनी सांगितले की, ‘कुलदीप एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याचा अनुभव आणि त्याची अचूकता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मला वाटते की, हिंदुस्थानी गोलंदाजीत वैविध्य आहे आणि ते सर्व आपापल्या परीने वेगळे आहेत. कुलदीप आपल्या डावखुऱ्या मनगटी फिरकीने फलंदाजांना चकवण्याची क्षमता ठेवतो, जडेजाची अचूक गोलंदाजी अत्यंत अनुभवी फलंदाजांनाही अडचणीत आणू शकते, तर सुथारची गोलंदाजी पारंपरिक डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीची आठवण करून देते.’
20 बळी घेण्याची क्षमता आहे.
मॉर्केल म्हणाले, ‘शुभमन गिल वेगवेगळय़ा परिस्थितीत गोलंदाजांचा कसा वापर करतो यावर संघाचे भवितव्य अवलंबून असेल; पण कौशल्याच्या बाबतीत त्या सर्वांमध्ये आमच्यासाठी 20 बळी घेण्याची क्षमता आहे. हिंदुस्थानचा फिरकी हल्ला संघासाठी एक आक्रमक पर्याय ठरतो. खासकरून गॉलची खेळपट्टी पाहता, सामना जसजसा पुढे जाईल तसतशी ती फिरकी गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे.’
तीन फिरकीपटूंना खेळवणे योग्य असेल
याबाबत मॉर्केल म्हणाले, ‘जर तुम्ही या मैदानाकडे पाहिले तर मला वाटते की, तीन फिरकी गोलंदाजांसह खेळणे हा योग्य मार्ग आहे. आमच्या फिरकी हल्ल्याकडे पाहता, हा एक अतिशय आक्रमक पर्याय आहे. ही एक चांगली खेळपट्टी दिसते आहे. आणि मला विश्वास आहे की, कसोटी जसजशी पुढे जाईल तसतसे त्यात काही बदल होतील.’
सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी तयार आहे
मॉर्केल म्हणाले की, ‘संघाने सर्व प्रकारच्या परिस्थितींसाठी तयारी केली आहे. या परिस्थितींमध्ये मानसिक बळ, दीर्घकाळ फलंदाजी करणे आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी करणे महत्त्वाचे ठरेल. अनुभवी मोहम्मद सिराजव्यतिरिक्त हिंदुस्थानला वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात गुरनूर ब्रार किंवा प्रसिध कृष्णा यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल, कारण या दोघांनाही कसोटी क्रिकेटचा मर्यादित अनुभव आहे.’
मॉर्केल यांनी वेगवान गोलंदाजांबद्दल सांगितले की, ‘प्रसिध किंवा ब्रार ज्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल, तो जबाबदारी पेलण्यास सक्षम असेल. ते खूप देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत, जिथे गोलंदाजीसाठी परिस्थिती कठीण असते. येथे आल्यानंतर सर्वात मोठे आव्हान उष्णता आणि आर्द्रता असेल. कुकबर्रा चेंडू नरम होत असल्याने आपण सातत्यपूर्ण षटके कशी टाकू शकतो आणि दबाव कसा निर्माण करू शकतो हे महत्त्वाचे ठरेल.’
Comments are closed.