कपिल देव, बॉथमच्या पंगतीत ‘सर’ जडेजा! 90 व्या कसोटी सामन्यांतच पठ्ठ्याने इतिहास रचला
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने मोठा धमाका केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 350 व्या विकेटची नोंद केली. यासह कसोटी क्रिकेटमध्ये किमान 4,000 धावा आणि 350 हून अधिक फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवणारा तो जगातील केवळ चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे.
रविंद्र जडेजाची ही कामगिरी विशेष ठरली आहे. कारण या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जडेजाने आता कपिल देव, इयान बॉथम आणि डॅनियल व्हिटोरी या दिग्गजांच्या विशेष एलिट क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये शंभर कसोटी सामने खेळण्यापूर्वीच ही कामगिरी करणारा जडेजा हा एकमेव खेळाडू आहे. जडेजाने अवघ्या 90 कसोटी सामन्यांमध्येच हा ऐतिहासिक टप्पा गाठत आपल्या अष्टपैलू क्षमतेची प्रचिती दिली आहे.
रविंद्र जडेजाने या विक्रमामुळे कसोटी इतिहासातील सर्वोत्तम डाव्या हाताच्या फिरकीपटूंमध्येही आपले स्थान बळकट केले आहे. तो आता डावखुऱ्या फिरकीपटूंमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज बनला आहे. गेल्या दशकात टीम इंडियाच्या कसोटी विजयांमध्ये सातत्याने मोलाचे योगदान देणारा जडेजा, आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर टीम इंडियाचा कणा ठरला आहे.
Comments are closed.