CSK चा मुख्य प्रशिक्षक म्हणून इऑन मॉर्गन-ब्रेंडन मॅक्युलम दोघही नको! माजी खेळाडूने दर्शवली नापसंती, सुचवलं नवीन नाव
चेन्नईच्या सुपर किंग्सच्या यशात मोलाची कामगिरी पार पाडणारे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर संघाची साथ सोडली. खेळाडू म्हणून चेन्नईसोबत सुरू झालेल्या त्यांचा प्रवास यशस्वी प्रशिक्षक म्हणून संपुष्टात आला. एक दोन नव्हे तर तब्बल 5 आयपीएल जेतेपद त्यांनी संघाला मिळवून दिली. त्यामुळे स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी आता नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधत CSK संघ आहे. यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनच्या नावाची चर्चा सुरू होती.
टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर. अश्विनने इऑन मॉर्गनचे नाव सुचवले होते, तर काहींनी ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नावाचा विचार केला होता. मात्र, टीम इंडियाचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी या दोघांच्या नावांना स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्या मते, सीएसकेला बाहेरून कोणालाही आणण्याची गरज नाही आणि संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी हेच या पदासाठी सर्वोत्तम आणि उत्तम पर्याय आहेत. TOI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
प्रशिक्षकाच्या या नवीन बदलासोबतच सीएसकेसमोर एम. एस. धोनीच्या भविष्याबाबतचा निर्णय घेण्याचेही मोठे प्रश्नचिन्ह आहे. ऋतुराज गायकवाड आणि तरुण खेळाडूंभोवती संघ बांधत असताना, धोनीची भविष्यातील भूमिका काय असेल हे निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. श्रीकांत यांच्या मते, ही गोष्ट स्पष्ट झाल्यानंतरच संघाची पुढील रचना योग्य प्रकारे आकारास येईल.
Comments are closed.