IND vs SL: भारत-श्रीलंका वनडे सामन्याचं ठिकाण बदललं! पहिला सामना कोणत्या शहरात होणार?

भारत आणि श्रीलंका (Odi series between IND vs SL) यांच्यात 13 डिसेंबर रोजी होणारा पहिला वनडे सामना आता दिल्लीऐवजी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेने (DDCA) खराब हवामानाची शक्यता आणि स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे सामना अन्य ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची (Arun Jetli Stadium Delhi) खेळपट्टी आणि मैदान सुधारण्याचे काम सुरू आहे. यासाठी मैदानावरील मातीवर वाळू टाकून नव्याने मैदान तयार केले जात आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी 3 महिने लागणार आहेत.

दिल्ली क्रिकेट संघटनेच्या माहितीनुसार, वाढते प्रदूषण आणि मैदानाच्या नूतनीकरणाचे काम लक्षात घेऊन बीसीसीआयकडे सामना दिल्लीबाहेर हलवण्याची विनंती करण्यात आली होती.

दरम्यान, यापूर्वीही भारत-श्रीलंका मालिकेतील सामन्याचे ठिकाण बदलण्याबाबत चर्चा सुरू होती. सुरुवातीला हा सामना अहमदाबादमध्ये होणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, बीसीसीआयचे (BCCI) सचिव देवजीत सैकिया यांनी त्या माहितीचे खंडन केले होते. आता बीसीसीआयने अधिकृतपणे पहिला वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील वनडे मालिका ऑगस्ट 2024 मध्ये खेळवण्यात आली होती. या 3 सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 2-0 ने विजय मिळवला होता. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता, तर पुढील दोन्ही सामन्यांत श्रीलंकेने विजय मिळवला होता.

या मालिकेची सुरुवात 13 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याने होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 16 डिसेंबर रोजी बंगळुरू येथे, तर तिसरा सामना अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.

यानंतर 22 डिसेंबरपासून टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात होईल.

वनडे मालिकेचे वेळापत्रक

13 डिसेंबर – पहिला वनडे, विशाखापट्टणम

16 डिसेंबर – दुसरा वनडे, बंगळुरू

तिसरा वनडे – अहमदाबाद

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

22 डिसेंबर – पहिला टी-20, राजकोट

24 डिसेंबर – दुसरा टी-20, कटक

27 डिसेंबर 2026 – तिसरा टी-20, पुणे

टी-20 मालिकेतील तिन्ही सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

Comments are closed.