हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडावं? अंबाती रायडूने सांगितलं मोठं कारण

आयपीएल 2027 (Indian Premier league 2027) पूर्वी हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians & Punjab kings) आणि पंजाब किंग्स यांच्यात या स्टार अष्टपैलू खेळाडूच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, पंजाब किंग्स हार्दिकला आपल्या संघात घेण्यास इच्छुक आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने (Ambati Rayudu on Hardik pandya) हार्दिकला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रायडूच्या मते, हार्दिकने सध्या कर्णधारपदाची जबाबदारी घेण्यापासून दूर राहावे आणि केवळ खेळाडू म्हणून आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे.

रायडूच्या मते, हार्दिकच्या कारकिर्दीतील या टप्प्यावर त्याने मानसिकदृष्ट्या शांत आणि सहज राहणे अधिक महत्त्वाचे आहे. कोणत्याही अतिरिक्त दबावाशिवाय त्याने क्रिकेटचा आनंद घेत खेळावे. तसेच, ज्या संघात त्याला मोकळेपणाने खेळता येईल, अशा संघाचा त्याने भाग व्हावे.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, या संभाव्य व्यवहारावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पंजाब किंग्सकडून श्रेयस अय्यरच (Shreyas Iyer) कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हार्दिकला या संघात नेतृत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता कमी आहे.

अंबाती रायडूच्या मते, ही परिस्थिती हार्दिकसाठी फायदेशीर ठरू शकते. त्याने सर्वप्रथम नव्या संघाच्या वातावरणाशी जुळवून घ्यावे आणि फ्रँचायझीच्या कामकाजाची पद्धत समजून घ्यावी. त्यानंतरच नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याचा विचार करावा.

रायडू म्हणाला की, जर तो हार्दिकच्या जागी असता, तर अशा संघाची निवड केली असती, जिथे त्याला आपल्या खेळाचा आनंद घेता येईल आणि मानसिकदृष्ट्याही चांगले वाटेल. त्याच्या मते, हार्दिकने सुरुवातीलाच स्वतःवर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचे ओझे घेऊ नये. आधी संघातील खेळाडूंशी चांगला समन्वय साधावा आणि मैदानावरील कामगिरीतून संघासाठी योगदान द्यावे.

रायडूचा हा सल्ला केवळ पंजाब किंग्सपुरता मर्यादित नाही. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्येच कायम राहिला, तरी त्याने कर्णधारपद सोडून केवळ खेळाडू म्हणून खेळावे, असे रायडूचे मत आहे.

विशेष म्हणजे, आयपीएल 2024 पूर्वी हार्दिकने गुजरात टायटन्सची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी फ्रँचायझीने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिककडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते. मात्र, कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दिकसाठी परिस्थिती फारशी अनुकूल राहिली नाही. मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन हंगामांत निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला आणि संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही.

रायडूच्या मते, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना हार्दिकवर दबाव होता. ड्रेसिंग रूममध्ये एखाद्या खेळाडूला सहज आणि सकारात्मक वातावरण मिळाले नाही, तर त्याचा परिणाम त्याच्या खेळावर आणि मैदानावरील निर्णयांवरही होऊ शकतो. रायडूने असेही म्हटले की, गेल्या काही काळात हार्दिकच्या बाजूने अनेक गोष्टी घडल्या नाहीत. मात्र, या सर्व गोष्टींसाठी केवळ हार्दिकलाच पूर्णपणे जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही.

Comments are closed.