IND Vs ZIM – वैभवचा रुद्रावतार आणि मयंक यादवची धारधार गोलंदाजी; हिंदुस्थाने केला झिम्बाब्वेचा सुपडा साफ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात हिंदुस्थानने झिम्बाब्वेचा 35 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह हिंदुस्थानने तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकत झिम्बाब्वेचा व्हाईटवॉश केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांत 5 बाद 192 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ निर्धारित 20 षटकांत 7 बाद 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या 2 धावा काढून बाद झाला. मात्र, वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 81 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. याशिवाय ईशान किशनने 29, कर्णधार श्रेयस अय्यरने 27 आणि रिंकू सिंहने 25 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेच्या वतीने ब्रैड इवांसने सर्वाधिक 2 बळी टिपले.

टीम इंडियाने दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली, जिथे पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेट बाद झाला. झिम्बाब्वेकडून रयान बर्लने झुंज देत 54 धावांची अर्धशतकी खेळी केली, परंतु हिंदुस्थानच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. हिंदुस्थानतर्फे मयंक यादवने पुन्हा एकदा घातक गोलंदाजी करत सर्वाधिक 3 बळी घेतले. याआधीच्या दोन सामन्यांतही हिंदुस्थानने अनुक्रमे 7 गडी राखून आणि 90 धावांनी दणदणीत विजय मिळवले होते.

Comments are closed.