HOCKEY: पाकिस्तानला धूळ चारत भारताची फायनलमध्ये धडक; आता जपानसमोर मोठं आव्हान!
यंदाच्या आशिया कपमधील आपली दमदार कामगिरी कायम राखत, भारतीय पुरुष ‘अंडर-18’ हॉकी संघाने कावासाकी हेवी इंडस्ट्रीज हॉकी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धचा रोमांचक सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. शेवटच्या क्वार्टरमध्ये प्रवेश करताना भारत 3-2ने पिछाडीवर होता, परंतु खेळाडूंनी सामन्याच्या अंतिम मिनिटांत पूर्णपणे चित्र पालटले आणि 5-3 असा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या रोमांचक सामन्यात एकूण चार गोल करत पूर्ती आशिष तानी विजयाचा शिल्पकार ठरला.
कोणत्याही खेळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे रोमांचक थरार असतो. हा उपांत्य सामनाही त्याला अपवाद नव्हता. पहिल्या सत्रात 12व्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला, आशिष तानीने त्याचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आणि सत्राच्या समाप्तीपर्यंत ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि 27व्या मिनिटाला अदीलने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सत्रात 35व्या मिनिटाला अली शाहरुखने गोल करून भारताला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानने लगेचच मोहम्मद फरहान अस्लमच्या गोलद्वारे प्रत्युत्तर दिले आणि पुन्हा 2-2 अशी बरोबरीवर आणली. त्यानंतर तिसऱ्या सत्रातच 42व्या मिनिटाला पाकिस्तानच्या उझैर अहमदने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून आपल्या संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
सामन्याचे अंतिम सत्र आणि त्यातील निकालात पूर्णपणे बदल घडवून आणण्याचे श्रेय भारतीय खेळाडू आशिष तानीला जाते. त्याने 49व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर 53व्या व 56व्या मिनिटाला आणखी दोन गोल करत पाकिस्तानचा पराभव निश्चित केला व भारतीय संघाला 5-3 अशी आघाडी मिळवून दिली. आता भारतीय संघ 6 जून रोजी होणाऱ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, ‘अंडर-18’ हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची भारताची ही तिसरी वेळ आहे; यापूर्वी संघाने 2001 आणि 2016 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
Comments are closed.