Asian Games 2026 मध्ये भारताने पटकावले पहिले सुवर्ण, महिला क्रिकेट संघाची पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या महिला क्रिकेट संघांचा मंगळवारी (22 सप्टेंबर) अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताने श्रीलंकेला 147 धावांनी पराभूत केले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे सलग दुसरे आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक ठरले आहे. भारताने 2023 च्या आशियाई स्पर्धेतही सुवर्णकामगिरी केली होती.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शफालीने स्मृती मानधनासोबत भारताच्या डावाला उत्तम सुरूवात केली. शफालीने स्मृतीसोबत पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 79 धावा आणि हरमनप्रीतने 19 धावा केल्या. तसेच ऋषा घोष 49 धावांवर नाबाद राहिली. भारताने 20 षटकांत 3 विकेट्स गमावत 216 धावसंख्या उभारली होती.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने सावध सुरूवात केली होती, मात्र अनुभवी दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांनी पहिल्यापासूनच श्रीलंकेच्या फलंदाजावर वर्चस्व कायम ठेवले होते. त्यामुळे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 15.4 षटकांत 69 धावांवर सर्वबाद झाला.

भारताकडून दीप्तीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, श्री चरणी आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताने सुवर्णपदक जिंकत पाकिस्तानची बरोबरी केली आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने 2010 आणि 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सलग दोन सुवर्ण पदक जिंकले होते. भारताने 2023 आणि 2026 च्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी करत पाकिस्तानची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, भारतीय महिला क्रिकेट संघाने 2023 च्या आधी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळला नव्हता.

या स्पर्धेत श्रीलंका रौप्य, तर पाकिस्तान कांस्य पदकाचा मानकरी ठरला. पाकिस्तानने बांगलादेशचा 31 धावांनी पराभव करत कांस्य पदक पटकावले.

Comments are closed.