हिंदुस्थान बनला ’एशियन किंग’ ; आशिया चषक हॉकी स्पर्धेची फायनल जिंकली
हिंदुस्थानने 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद दिमाखदारपणे पटकावले. हिंदुस्थानने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा फडशा पाडत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत यजमान जपानवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवत त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली. या विजयामुळे भारत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी देश ठरला आहे. कारण सर्वाधिक तीनवेळा जेतेपद त्यांनी आपल्या नावावर केले आहे.
सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. आशिष तानी पूर्तीने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्राच्या क्वार्टरच्या अखेरीस 28 व्या मिनिटाला आशिषनेच हिंदुस्थानसाठी दुसरा गोल केला. 30 व्या मिनिटाला केतन कुशवाहाने गोल केला आणि संघाने 3-0 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या सत्राच्या चौथ्या मिनिटाला आशिषने भारतासाठी आणखी एक गोल करून आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि संघाची आघाडी 4-0 अशी वाढवली. 52व्या मिनिटाला जपानच्या नुमाडा गाकूने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर भारताने यजमानांना कोणतीही संधी दिली नाही.
Comments are closed.