सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर ‘X’

सूर्यकुमार यादव यांनी त्यांच्या निवृत्तीची वस्तुस्थिती तपासण्याची घोषणा केली : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजची सकाळ एका मोठ्या धक्क्याने झाली. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (SKY) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्याची एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर तुफान व्हायरल झाली. नुकतेच सूर्यकुमारला टी-20 कर्णधारपदावरून हटवून त्याच्या जागी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. या घडामोडींनंतर लगेचच ही पोस्ट आल्याने चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

नक्की काय होते त्या व्हायरल पोस्टमध्ये? (Suryakumar Yadav Announce His Retirement Fact Check)

सूर्यकुमारच्या नावाने असलेल्या एका अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले की, “भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकारापासून ते टी-20 विश्वचषक जिंकण्यापर्यंतचा हा प्रवास अविस्मरणीय होता. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय (BCCI), माझे सहकारी आणि सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. आता आयुष्याच्या पुढील टप्प्याकडे…”

…पण ‘ती’ पोस्ट निघाली खोटी! (Suryakumar Yadav News)

या पोस्टमुळे चाहते भावुक झाले आणि त्यांनी सूर्याचे आभार मानण्यास सुरुवात केली. मात्र, थोड्याच वेळात या पोस्टमागील सत्य समोर आले. ती पोस्ट सूर्यकुमारच्या अधिकृत अकाउंटवरून नव्हे, तर एका फेक (बनावट) अकाउंटवरून करण्यात आली होती.

या बनावट अकाउंटचे हँडल ‘@unreal_skyy’ असे आहे आणि त्याला केवळ 40 फॉलोअर्स आहेत. याउलट, सूर्यकुमार यादवचे अधिकृत ट्विटर हँडल ‘@surya_14kumar’ हे असून त्याला 4.3 दशलक्ष (43 लाख) हून अधिक फॉलोअर्स आहेत. सत्य समजल्यानंतर अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केला, तर काहींनी मिम्स शेअर करत या खोडसाळपणाची खिल्ली उडवली. एका चाहत्याने लिहिले की, “एका महान टी-20 खेळाडूची अशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी बदनामी करणे लाजिरवाणे आहे.”

कर्णधारपद गमावल्यानंतर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया

नुकत्याच जाहीर झालेल्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या 2026 टी-20 विश्वचषकात भारताला आपल्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमारला या संपूर्ण मालिकेतूनच विश्रांती किंवा वगळण्यात आले आहे. असे असले तरी, सूर्यकुमारने अत्यंत खिलाडूवृत्ती दाखवत श्रेयस अय्यरचे कौतुक केले आहे. मुंबई टी-20 लीगच्या टॉस दरम्यान बोलताना तो म्हणाला, “मी श्रेयस अय्यरसाठी खूप आनंदी आहे. आम्ही मुंबई आणि भारतासाठी एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत. मुंबईचे सलग तीन खेळाडू भारताचे कर्णधार होणे हा आमच्या शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

फॉर्ममधील घसरण ठरली कारण?

मुख्य निवडक अजित आगरकर यांनी या बदलाचे कारण स्पष्ट केले आहे. आगरकर म्हणाले की, विश्वचषक जिंकल्यानंतर पुढील दोन वर्षांच्या काळाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै 2024 मध्ये पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमारच्या वैयक्तिक कामगिरीत घसरण झाली होती. त्याची फलंदाजीची सरासरी 43.60 वरून 25.88 वर आली, तर स्ट्राईक रेटही 168.75 वरून 152.03 वर घसरला होता.

हे ही वाचा –

IND vs AFG Test Empty Stadium : थाट मोठा पण प्रेक्षक गायब! ‘विराट पर्व’ संपताच टीम इंडियाची कसोटी झाली पोरकी; बीसीसीआयवर रडण्याची वेळ, 50 रुपयांतही कोणी फिरेना

Comments are closed.