भारत-सायप्रस धोरणात्मक भागीदारी मजबूत झाली
पुढील पाच वर्षांत गुंतवणूक दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : अध्यक्षांची पंतप्रधान मोदींसमवेत द्विपक्षीय चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-सायप्रस संबंध अधिक भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांच्यात शुक्रवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधील मैत्री केवळ घट्टच नाही, तर ती भविष्यातील गरजा आणि शक्यतांशी सुसंगत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी या चर्चेनंतर केले. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय गुंतवणूक दुप्पट करण्याचे ध्येयही निश्चित करण्यात आले.
सायप्रस प्रजासत्ताकचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सायप्रसच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. सायप्रसचे अध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस यांचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. गेल्यावर्षी सायप्रसमध्ये त्यांनी माझे अत्यंत आपुलकीने स्वागत केले होते. याचदरम्यान मला सायप्रसचा सर्वोच्च सन्मान देऊन भारताप्रती आदर दाखवला होता, असे मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या या चर्चा आणि वाढत्या गाठीभेटी ही आपल्या सामायिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारत आणि सायप्रस यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे. लोकशाही आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवरील सामायिक विश्वास हा आमच्या भागीदारीचा पाया आहे. आम्ही सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतो. भारत या तत्त्वांप्रति पूर्णपणे वचनबद्ध असून भविष्यातही हेच धोरण राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गेल्या दशकात सायप्रसकडून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाली आहे. दोन्ही देशांमधील विश्वास वाढला आहे आणि भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. याचा फायदा घेऊन पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक पुन्हा दुप्पट करण्याचे आमचे ध्येय आहे. ही वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या विश्वासपूर्ण संबंधांना सामरिक भागीदारीच्या स्तरावर नेत असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आणि सायप्रसच्या अध्यक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी युक्रेन असो किंवा पश्चिम आशिया, संघर्ष लवकर संपुष्टात आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देत राहू, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. वाढत्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे, यावरही आमचे एकमत आहे. भारत-सायप्रस संबंध वारंवार काळाच्या कसोटीवर उतरले आहेत. आज भारत-सायप्रस सामरिक भागीदारीमुळे आम्ही आमच्या संबंधांना नवी महत्त्वाकांक्षा आणि नवी गती देणार आहोत, असेही संयुक्त बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
जागतिक मुद्द्यांवरही चर्चा
दोन्ही नेत्यांमध्ये जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. युक्रेनचा मुद्दा असो किंवा पश्चिम आशियातील परिस्थिती असो, भारत शांतता आणि संघर्षांच्या लवकर निराकरणासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील. जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. भारत-सायप्रस सामरिक भागीदारी दोन्ही देशांमधील संबंधांना नवी ऊर्जा, नवी महत्त्वाकांक्षा आणि नवी गती देईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला.
संबंध बळकट करण्यास प्रोत्साहन
भारत आणि सायप्रस यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करणे, तसेच भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील व्यापक सामरिक भागीदारीला पुढे नेणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अध्यक्ष ख्रिस्तोदौलिदेस यांनी स्पष्ट केले. मी आज येथे केवळ सायप्रस प्रजासत्ताकाचा अध्यक्ष म्हणून नव्हे, तर सध्या युरोपियन युनियनच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या युरोपियन युनियन सदस्य राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.