हिंदुस्थानला मालिका विजयाची संधी; विंडीजसाठी आरपारची लढाई
इंदूरमध्ये धावांचा पाऊस पडला, आता हैदराबादमध्ये चौकार-षटकारांचा महापूर येण्याची चिन्हे आहेत. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील चौथ्या लढतीसाठी मैदान सज्ज झाले असून फलंदाजांना पोषक खेळपट्टीवर पुन्हा एकदा गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. टीम इंडियाची 2-1 अशी आघाडी असल्याने त्यांना मालिका विजयाची संधी असेल, मात्र वेस्ट इंडीजला मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजयाशिवाय पर्याय नाही. याचाच अर्थ टीम इंडियाकडे आघाडी असल्याने विंडीजसाठी उद्या आरपारची लढाई असेल.
इंदूरमध्ये दोन्ही संघांच्या आक्रमक फलंदाजीने विक्रमांचे दरवाजे ठोठावले. आता हैदराबादसारखे फलंदाजांसाठी नंदनवन असलेले मैदान समोर आहे. या मैदानावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 208 आणि 187 धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठण्यात आले आहे. एका सामन्यात हिंदुस्थानला 300 धावांचा टप्पा गाठण्याची संधीही मिळाली होती, मात्र अखेर हिंदुस्थानला पूर्ण तीनशे धावांपर्यंत पोहोचता आले नाही. तरीही पूर्ण सदस्य देशांमधील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या हिंदुस्थानने याच लढतीत नोंदवली होती. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाजीचा वारसाही या मैदानाला लाभला आहे. अभिषेक शर्मा, ट्रव्हिस हेड आणि हेन्रीक क्लासेनसारख्या फलंदाजांनी मोठय़ा धावसंख्येचा धडाका लावण्याची सवयच लावली आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये गोलंदाजांना जराही ढिलाई परवडणारी नाही.
कुलदीपाला पुन्हा बाकावर बसवणार?
इंदूरमध्ये कुलदीप यादवऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देण्याचा हिंदुस्थानचा निर्णय यशस्वी ठरला. त्यामुळे हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन विजयी संयोजन कायम ठेवण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, नमन धीर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, प्रिन्स यादव, मयांक यादव आणि अर्शदीप सिंग यांना संभाव्य संघात स्थान मिळू शकते.
शेफर्डच्या तंदुरुस्तीची काळजी
वेस्ट इंडीजला मात्र रोमारियो शेफर्डच्या तंदुरुस्तीची चिंता आहे. रांचीमध्ये गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने फलंदाजी केली, पण इंदूरच्या सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली. तो उपलब्ध न झाल्यास क्वेंटिन सॅम्पसनला संधी मिळू शकते. शे होपच्या नेतृत्वाखालील संघात काईल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि शेरफन रदरफोर्ड या आक्रमक फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल.
धावांच्या आतषबाजीला पौष्टिक फील्ड!
हैदराबादच्या खेळपट्टीचे अलीकडे नव्याने नूतनीकरण करण्यात आले आहे. तरीही येथे मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत या मैदानावर टी-20 क्रिकेटमध्ये 310, 297, 286 आणि 277 अशा मोठय़ा धावसंख्यांची नोंद झाली आहे. हिंदुस्थानातील टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च आठ धावसंख्यांपैकी चार याच मैदानावर उभारल्या गेल्या आहेत. त्यात दव पडल्यास गोलंदाजांची अडचण आणखी वाढू शकते. पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता नसल्याने चाहत्यांना धावांचा आणखी एक थरार अनुभवायला मिळू शकतो.
गोलंदाजी संघ इंडियाची डोकेदुखी!
मालिकेत यजमान टीम इंडियाचे पारडे जड असले तरी मोठय़ा धावसंख्येचे संरक्षण करण्यात आलेले अपयश संघासाठी चिंतेचा विषय आहे. या दौऱयात आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱया संघाला विजय मिळाला. इंदूरमध्ये हिंदुस्थानने धावसंख्येचा बचाव करत विजय मिळवला होता. आता हैदराबादमध्येही गोलंदाजांना मदत करणारी थोडीफार परिस्थिती मिळावी, अशी हिंदुस्थानी संघाची अपेक्षा असेल. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मोठी धावसंख्या उभारली तर ती टिकवून ठेवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.
Comments are closed.