IND vs WI: तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने विजय! मालिका मात्र 2-1 ने टीम इंडियाच्या नावावर

न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या वनडेत वेस्ट इंडिजने भारताचा 5 विकेट्सनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 विकेट्स गमावून 351 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 48.2 षटकांत हे लक्ष्य गाठत सामना जिंकला. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने (Shai hope Century) नाबाद 162 धावांची सामनाविजयी खेळी केली. वनडे क्रिकेटमधील वेस्ट इंडिजचा हा सर्वात मोठा धावांचा यशस्वी पाठलाग ठरला. या पराभवानंतरही भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

शाई होप वेस्ट इंडिजकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. होपने 143 चेंडूंमध्ये नाबाद 162 धावांची ऐतिहासिक खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 3 षटकार मारले.

352 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुख्य सलामीवीर दुखापतग्रस्त झाल्यानंतरही वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली. क्षेत्ररक्षण करताना ज्वेल अँड्र्यूला दुखापत झाली होती. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला नाही आणि शाई होपने डावाची सुरुवात केली. मागील सामन्यात शतक झळकावणारा जॉन कॅम्पबेल 10 धावा करून बाद झाला. मात्र, शाई होप आणि आमिर जंगू यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

होप आणि आमिर जंगू यांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. आमिर जंगू 56 चेंडूंत 67 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार होता. त्यानंतर शरफेन रदरफोर्ड 25 चेंडूंत 24 धावा करून बाद झाला. 30 षटकांनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या 206 धावांवर 3 विकेट्स अशी होती. त्यावेळी शाई होपशिवाय कोणताही विशेष फलंदाज उरला नसल्याने भारत सामना जिंकेल असे वाटत होते.

मात्र, गोलंदाजी अष्टपैलू कीमो पॉलने कर्णधार होपला चांगली साथ दिली आणि वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. पॉलने 35 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. त्यानंतर मैथ्यू फॉर्डही 7 धावा करून बाद झाला.

44व्या षटकात 290 धावांवर वेस्ट इंडिजच्या 5 विकेट्स गेल्या. त्यामुळे सामना आता वेस्ट इंडिजच्या हातातून निसटला आहे, असे वाटत होते. भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, शाई होपने हार मानली नाही. त्याने दुसऱ्या बाजूने सातत्याने धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले.

यानंतर गुडाकेश मोतीनेही होपला चांगली साथ दिली. दोघांनीही त्यानंतर एकही विकेट गमावून न देता 10 चेंडू शिल्लक असतानाच वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.

याआधी भारताकडून केएल राहुलने नाबाद 129, रोहित शर्माने 92 आणि ऋतुराज गायकवाडने 57 धावांची खेळी केली. शुबमन गिल 1 धावांवर, तर विराट कोहली शून्यावर बाद झाला. असे असतानाही भारताने 351 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. या सामन्यातील पराभवासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली आहे.

Comments are closed.