दुहेरी जेतेपदासाठी हिंदुस्थानची आज चढाई; उपांत्य फेरीत हिंदुस्थानच्या दोन्ही संघांचे सहज विजय, पुरुष गटात श्रीलंकेशी तर महिलांची युगांडाशी अंतिम झुंज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यजमान हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षेप्रमाणे आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. हिंदुस्थान दुहेरी जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरुष गटात श्रीलंकेशी तर महिला नवख्या युगांडाचा सहज फडशा पाडतील, हेच या स्पर्धेचे अचूक भाकीत आहे.

केनियाने जिंकली मने

या स्पर्धेत आफ्रिकन खंडातून आलेल्या केनियाच्या दोन्ही संघांनी हिंदुस्थानींची आणि कबड्डीप्रेमींची मने जिंकली. या पूर्ण स्पर्धेत श्रीलंका आणि केनिया यांच्यातील महिला गटाचा एकमेव सामना रंगला होता. आज पुरुष गटात हा थरार उपांत्य लढतीत पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात केनियाने श्रीलंकेला जोरदार टक्कर देत शेवटची पाच मिनिटे असताना स्कोर 19-22 असा आणला होता. मात्र अनुभवाच्या कमतरतेमुळे केनिया लंकेवर मात करण्यात थोडक्यात अपयशी ठरला आणि त्यांचे आव्हान 24-28 असे संपले. तसेच त्यांच्या महिलांनाही युगांडाकडून 21-23 अशी निसटती हार सहन करावी लागली. जोरदार खेळ करणाऱया केनियाचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत हरले असले तरी त्यांच्या खेळाने कबड्डी थराराचा अनुभव दिला.

हिंदुस्थानसमोर दोन्ही संघांची शरणागती

हिंदुस्थानने उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर कोणतीही दयामाया दाखवली नाही. महिलांमध्ये  निधी शर्मा, अनु सेन आणि साक्षीने सुस्साट खेळ करत श्रीलंकेचा 39-14  असा फडशा पाडला. हा सामना अन्य लढतींप्रमाणे एकतर्फीच झाला. तसेच पुरुष संघानेही बांगलादेशला पहिल्या मिनिटापासूनच पकडायला सुरुवात केले. एकीकडून शिवम पथारे, नीरज नरवाल आणि नवीन कुमारच्या वेगवान चढाया आणि दुसरीकडून शुभम शिंदे, अजित पवार आणि सुरजीत सिंगच्या भक्कम पकडींनी श्रीलंकेचा पराभव पहिल्या सत्रातच निश्चित केला. मध्यंतराला 28-8 अशी निर्णायक आघाडी असलेल्या हिंदुस्थानने 56-27 असा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

Comments are closed.