भारत एक अदृश्य सागरी योद्धा घेणार आहे
संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत जर्मनीसोबत करार शक्य : राजनाथ सिंह आजपासून जर्मनी दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मंगळवारपासून तीन दिवसीय जर्मनी द्रौयावर रवाना होत आहेत. दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या दौऱ्यादरम्यान एका महत्त्वाच्या संरक्षण औद्योगिक आराखड्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. तसेच भारत आणि जर्मनी यांच्यात सहा अत्याधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांचा करार झाल्यास भारताच्या ताफ्यात ‘अदृश्य समुद्री योद्धा’ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या पाणबुड्या अणु-पाणबुड्यांसोबत मिळून नौदल शक्तीला एक नवीन आयाम देतील. या पाणबुड्या पृष्ठभागावर न येता दोन ते तीन आठवडे पाण्याखाली राहून शत्रूचे लक्ष टाळून सामरिक कारवाया करू शकतात. हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार ठरण्याची शक्यता आहे.
भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 21 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान जर्मनीला भेट देणार आहेत. गेल्या सात वर्षांत भारतीय संरक्षण मंत्र्यांचा जर्मनीला होणारा हा पहिलाच दौरा आहे. यापूर्वी 2019 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी जर्मनीला भेट दिली होती. संरक्षणमंत्र्याच्या दौऱ्यात होणाऱ्या करारांतर्गत भारत आणि जर्मनी भविष्यात शस्त्रs आणि संरक्षण उपकरणे यांसारख्या लष्करी साधनांचा संयुक्तपणे विकास आणि उत्पादन करू शकतील. बर्लिनमध्ये राजनाथ सिंह त्यांचे जर्मन समकक्ष बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत विस्तृत चर्चा करतील.
या बैठकांमध्ये संरक्षण उद्योग सहकार्य वाढवणे, लष्करी संबंध दृढ करणे आणि सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या द्रौयादरम्यान दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण औद्योगिक सहकार्याशी संबंधित आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेसंबंधित प्रशिक्षणातील सहकार्याच्या करारावरही स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
जवळपास सात वर्षांनंतर भारतीय संरक्षणमंत्री जर्मनीला भेट देत असल्यामुळे हा दौरा विशेष मानला जात आहे. यापूर्वी निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये जर्मनीला भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री जर्मन संरक्षण उद्योगाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनाही भेटणार आहेत. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतात संयुक्त उत्पादन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा या भेटीचा उद्देश आहे. एकूणच, या दौऱ्यामुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.
पाणबुडी प्रकल्प केंद्रस्थानी
भारत ‘प्रोजेक्ट 75 इंडिया’ अंतर्गत सहा प्रगत पाणबुड्यांच्या निर्मितीच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. जर्मन कंपनी ‘थिसेनकुप मरीन सिस्टीम्स’सोबतचा हा करार अंतिम टप्प्यात आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि जर्मन कंपनीने जून 2023 मध्ये या प्रकल्पासाठी एका करारावर स्वाक्षरी केली होती. या दौऱ्यात या कराराशी संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरण आणि औद्योगिक सहकार्यावर सविस्तर चर्चा केली जाईल.
संपूर्ण 'मेक इन इंडिया'
संरक्षणमंत्री जर्मन संरक्षण उद्योगाच्या प्रतिनिधींनाही भेटतील. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणांच्या संयुक्त विकासाला आणि सह-उत्पादनाला प्रोत्साहन देणे, हा या बैठकीचा उद्देश आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनात जागतिक दर्जाचे प्रगत तंत्रज्ञान मिळवणे, हे भारताचे उद्दिष्ट आहे.
Comments are closed.