हिंदुस्थानच्या वाघिणींनी चिनी ड्रॅगनचाही उडवला धुव्वा
महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने बलाढय़ चीनचा 6-2 असा धुव्वा उडवत स्पर्धेतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. भोपाळच्या मैदानावर झालेल्या या लढतीत हिंदुस्थानी खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमणाचा धडाका लावत चीनच्या बचावफळीला अक्षरशः जेरीस आणले.
हिंदुस्थानच्या गोलधडाक्याची सुरुवात पहिल्याच मिनिटाला झाली. दीपिकाने मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. सहाव्या आणि चौदाव्या मिनिटाला तिने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे हिंदुस्थानने सुरुवातीलाच 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. चीनकडून फेंग किंगमियाओने 15 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पिछाडी कमी केली.
त्यानंतर 19 व्या मिनिटाला लालरेमसियामीने मैदानी गोल करत हिंदुस्थानची आघाडी 4-1 अशी केली. 22 व्या मिनिटाला नेहाने पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावत संघाला 5-1 अशी आघाडी मिळवून दिली.
चीनकडून फेंग किंगमियाओ आणि चेन टोंग यांनी गोल नोंदवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानी संघाच्या वेगवान चढाया, अचूक पासिंग आणि पेनल्टी कॉर्नरवरील प्रभावी अंमलबजावणीपुढे चीनचा बचाव निष्प्रभ ठरला. अखेर 6-2 असा दणदणीत विजय मिळवत हिंदुस्थानने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली.
या विजयामुळे हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. यापूर्वी मलेशियाला 4-1, दक्षिण कोरियाला 2-1 आणि थायलंडला 7-0 असे नमवणाऱया हिंदुस्थानने आता चीनलाही धूळ चारली. सलग चौथ्या विजयासह हिंदुस्थानने स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. आता बुधवारी 25 नोव्हेंबरला जपानविरुद्ध होणाऱया लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यातही हिंदुस्थान विजयाचा पंच मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
Comments are closed.