सिंचनासाठी ‘सूर्या’चे पाणी बंद; डहाणू-पालघरमधील रब्बी पिके धोक्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिंचनासाठी यंदा सूर्या प्रकल्पातील पाणी देण्यास पाटबंधारे विभागाने स्पष्ट नकार दिला आहे. याचा जबरदस्त फटका डहाणू आणि पालघर तालुक्यातील शंभर गावांमधील शेतकऱयांना बसणार असून तब्बल साडेचार हजारांहून अधिक हेक्टरवरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. आधीच पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या भातशेतीची माती झाल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला असताना अस्मानी संकटाच्या तडाख्यानंतर सरकारच्या या फतव्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱयांना दुसरा फटका बसणार आहे. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, मात्र पिकांसाठी पाणी सोडले नाही तर आम्ही काय खायचे, असा संताप या निर्णयानंतर दोन्ही तालुक्यांतील शेतकऱयांनी व्यक्त केला आहे. धामणी आणि कवडास धरणांमध्ये 89 टक्के पाणीसाठी उपलब्ध असताना शेतीला पाणी का नाही, असे संतप्त सवाल शेतकऱयांनी केला आहे.

दुष्काळग्रस्त यादीतूनही वगळले!

पालघर जिह्यातील आठ तालुक्यांपैकी पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. मात्र पालघर आणि डहाणू तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात कमी पावसामुळे खरीप भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून आता उन्हाळी सिंचनही बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत या दोन तालुक्यांतील शेतकऱयांना दुष्काळी मदत आणि नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

Comments are closed.