Asian Games 2026 Cricket: 114 धावा! भारताने बांगलादेशला चारली धूळ, सुवर्ण पदकासाठी श्रीलंकेशी सामना

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (20 सप्टेंबर) बांगलादेशशी भिडला. महिला क्रिकेटच्या या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 114 धावांनी पराभव केला आणि अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला आहे. यामुळे भारताचे रौप्यपदक निश्चित झाले असून सुवर्ण पदकासाठी ते श्रीलंकेशी दोन हात करतील.
निशीनच्या कोरोगी स्पोर्ट्स पार्कवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि शफाली वर्माच्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला 196 धावसंख्येचे लक्ष्य दिले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 15.4 षटकात 81 धावासंख्येवरच गारद झाला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शफाली आणि स्मृती मानधनाने सलामीला येत 72 धावांची भागीदारी केली. स्मृती 37 धावा करून बाद झाली, तर जी कमिलीनीही 3 धाव करून तंबूत परतली. त्यानंतर शफालीने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने भारताचा धावफलक हलता ठेवला.
शफाली-हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. शफाली 3 चौकार आणि 9 षटकारांच्या साहाय्याने 49 चेंडूंत नाबाद 100 धावा करून नाबाद राहिली, तर हरमनप्रीतने 40 धावा केल्या. विकेटकीपर-फलंदाज ऋषा घोष 2 धावा करून बाद झाली, तर भारती फुलमाळी 9 धावांवर नाबाद राहिली. यामुळे भारताने 20 षटकांत 4 विकेट्स गमावत 195 धावा केल्या.
बांगलादेशच्या डावात भारतीय गोलंदाजांनीही कमालीची कामगिरी केली.
नंदनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तसेच श्री चरणीने दोन, तर श्रेयांका पाटील आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Comments are closed.