शफाली वर्माची Asian Games मध्ये ऐतिहासिक शतकी खेळी, कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी!

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ रविवारी (20 सप्टेंबर) बांगलादेशशी भिडला. महिला क्रिकेटच्या या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारताने शफाली वर्माच्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य दिले. भारताने 20 षटकांत 4 विकेट्स गमावत 195 धावा केल्या.

या सामन्यात शफालीने 3 चौकार आणि 9 षटकारांच्या साहाय्याने 49 चेंडूंत नाबाद 100 धावा केल्या. तिने हे शतक भारताच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेत केले. तिचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच शतक ठरले आहे. तसेच तिच्या मर्यादित षटकांच्या कारकिर्दीतीलही हे पहिलेच शतक आहे. तिच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक शतक आहे.

शफालीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आता तिने ही शतकी खेळी करत इतिहास रचला आहे. ती आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक करणारी पहिलीच फलंदाज ठरली आहे.

शफालीने केली हरमनप्रीत कौरच्या विक्रमाची बरोबरी
शफालीने बांगलादेशविरुद्ध भारतासाठी संयुक्तरीत्या सर्वात जलद शतक झळकावत हरमनप्रीत कौरच्या टी 20 आंतरराष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली आहे. हरमनप्रीत 2018 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूंमध्ये टी 20 आंतरराष्ट्रीय शतक केले होते. शफालीनेही 49 चेंडूंमध्येच ही कामगिरी केली आहे.

महिलांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चेंडूंनुसार सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या फलंदाजाच्या नावावर आहे. डांयड्रा डॉटिनने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 चेंडूंतच शतक पूर्ण केले होते. तिच्याशिवाय कोणत्याही महिला खेळाडूला टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये 40 पेक्षा कमी चेंडूंत शतक करता आलेले नाही.

महिलांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वात जलद शतके (चेंडूंच्या आधारे)
38 – डिएंड्रा डॉटिन (वेस्ट इंडिज) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट किट्स, 2010
46 – ॲलिसा हिली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध श्रीलंका, उत्तर सिडनी, 2019
47 – टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, टॉन्टन, 2018
47 – लॉरा वोल्वार्ड्ट (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध भारत, जोहान्सबर्ग, 2026
47 – आयशा झफर (पाकिस्तान) विरुद्ध झिम्बाब्वे, कराची, 2026
49 – शफाली वर्मा (भारत) विरुद्ध बांगलादेश, निशिन, 2026
49 – हरमनप्रीत कौर (भारत) विरुद्ध न्यूझीलंड, प्रॉव्हिडन्स, 2018

(शफाली वर्मा मेडेन व्हाईट बॉल सेंच्युरी आणि आशियाई गेम्स INDvsBAN 2026 मध्ये शतक करणारी पहिली फलंदाज बनली)

Comments are closed.