'भारताची वाटचाल आर्थिक संकटाकडे'
कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात राहुल गांधींचा दावा : बेरोजगारी-शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या गांधी यांनी भारत आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा केला. या समस्येसाठी त्यांनी देशातील व्यापक बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी ही मुख्य कारणे सांगितली. दरम्यान, आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर आपले विचार व्यक्त केल्याने भाजपने राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भारत सध्या एका आर्थिक संकटाच्या दिशेने वाटचाल करत असून त्याच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. प्रसारमाध्यमे या परिस्थितीवर प्रकाश टाकत नसले तरी, देशातील बेरोजगारीची समस्या अत्यंत गंभीर आहे. शिवाय, शिक्षण व्यवस्था देखील मोठ्या आव्हानांना तोंड देत असल्याचे ते म्हणाले. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर केवळ वरवरची चर्चा केल्याने समस्या सुटणार नाहीत. बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आव्हानांवर गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. विद्यापीठातील युवावर्गाने उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना राहुल गांधी यांनी उत्तरे दिली.
Comments are closed.