INS महेंद्रगिरी नौदलात सामील.
स्वदेशी क्षेपणास्त्रs अन् सेन्सर्सने सुसज्ज : 75 टक्क्यांपेक्षा जास्त भाग ‘मेड इन इंडिया’
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम नौदल गोदीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी ‘आयएनएस महेंद्रगिरी’ला भारतीय नौदलात सामील केले. महेंद्रगिरी ही प्रोजेक्ट-17ए निलगिरी वर्गातील सहावी स्टेल्थ फ्रिगेट आहे. या युद्धनौकेतील 75 टक्केपेक्षा जास्त उपकरणे आणि तंत्रज्ञानात ‘मेड इन इंडिया’चा वापर करण्यात आला आहे. ती एकाचवेळी हवाई हल्ले, शत्रूची जहाजे आणि पाणबुड्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. या युद्धनौकेमुळे हिंद महासागरात भारताची सागरी सुरक्षा आणखी मजबूत झाल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
‘आयएनएस महेंद्रगिरी’ अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रs, सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालींनी सुसज्ज आहे. ही युद्धनौका एक बहुउद्देशीय स्टेल्थ फ्रिगेट, एकाचवेळी हवाई, सागरी आणि पाण्याखालील धोक्यांचा सामना करू शकते. नौदलाच्या मते, आयएनएस महेंद्रगिरी सुरक्षित आणि स्थिर इंडो-पॅसिफिक क्षेत्र सुनिश्चित करण्यात भूमिका बजावेल.
कुर्नूल होणार ‘ड्रोन सिटी’
आंध्रप्रदेशातील कुर्नूल येथे आठ ड्रोन कंपन्यांच्या सहकार्याने ‘ड्रोन सिटी’ विकसित केली जात असल्याची घोषणा संरक्षणमंत्र्यांनी शुक्रवारच्या कार्यक्रमप्रसंगी केली. ज्याप्रमाणे सुरत ‘डायमंड सिटी’ आणि बंगळूर ‘सिलिकॉन व्हॅली’ म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे कुर्नूल भविष्यात देशाचे ड्रोन केंद्र बनेल, असा आशवाद राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
आयएनएस महेंद्रगिरीची वैशिष्ट्यो
75 टक्केपेक्षा जास्त स्वदेशी तंत्रज्ञान : भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने डिझाइन केलेली आणि मुंबईस्थित माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) बांधलेली ही युद्धनौका 75 टक्केपेक्षा जास्त स्वदेशी उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करते. देशभरातील अनेक एमएसएमई कंपन्यांनीही तिच्या बांधकामात योगदान दिल्यामुळे संरक्षण उत्पादनाला चालना मिळाली आणि रोजगाराच्या संधी वाढल्या.
आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज : महेंद्रगिरी आधुनिक पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली, प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, पाणबुडीविरोधी युद्ध प्रणाली आणि एकात्मिक लढाऊ व्यवस्थापन प्रणालींनी सुसज्ज आहे.
स्टेल्थ तंत्रज्ञान आणि उच्च-गती क्षमता : महेंद्रगिरी प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे तिला रडारवर शोधणे कठीण होते. यात संयुक्त डिझेल आणि गॅस प्रणोदन प्रणाली बसवलेली असल्यामुळे ते जास्त वेगाने आणि लांब अंतरावर धावू शकते.
Comments are closed.